नगर शहरातील अवजड वाहतुकीला जिल्हाधिका-यांनी अखेर बंदी घातली आहे. तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिला आहे. जड वाहनांना महापालिका हद्दीत थांबण्यासही बंदी करण्यात आली आहे.
नगर शहरातून सहा राज्यमार्ग जातात. हीच गोष्ट रहदारीच्या दृष्टीने तापदायक आहे. शहरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक हा मोठाच डोकेदुखीचा विषय आहे. केवळ रहदारी अडथळाच म्हणूनच नव्हे तर त्यामुळे सातत्याने होणारे अपघात आणि त्यात जाणारे बळी अशा विविध कारणांनी शहरातील अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी ही नगरकरांची जुनीच मागणी आहे. अलीकडच्या सहा महिन्यांतच या वाहतुकीने सहा ते सात जणांचे बळी घेतले. या मोठय़ा रहदारीमुळे अंतर्गत वाहतुकीलाही मोठाच अडथळा होतो. आमदार अनिल राठोड यांनी दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कवडे यांची भेट घेऊन ही अवजड वाहतूक बाह्य़वळण रस्त्याने वळवण्याची मागणी केली होती. याबाबत कवडे यांनी मंगळवारी आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार मनमाड आणि औरंगाबादकडून पुणे-मुंबई-कल्याण-कोल्हापूरकडे जाणा-या-येणा-या अवजड वाहनांना आता विळद येथून बाह्य़वळण रस्त्याने शहराबाहेरून जावे लागेल. मनमाडकडून येणा-या वाहनांना त्यात फारशी अडचण नाही, मात्र औरंगाबादकडून येणा-या वाहनांना शेंडीहून विळदकडे येऊन पुढे बाह्य़वळण रस्त्याने जावे लागले. या वाहनांना मनपा हद्दीतून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय मनमाडकडून सोलापूरकडे येणा-या-जाणा-या वाहनांना तसेच नगरची स्थानिक बाजारपेठ व औद्योगिक वसाहतीत येणा-या वाहनांही मनपा हद्दीतून म्हणजेच शहरातून ये-जा करण्यास वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत या वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वेळेत अशा वाहनांना मनपा हद्दीतून ये-जा करता येणार नाही. दि. १ फेब्रुवारी २००९ च्या अधिसूचनेत बदल करून ही नवी अधिसूचना काढण्यात आली असून त्याची लगेचच अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेने कळवले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा