राज्यात प्लॅस्टिक आणि थर्माकोल वस्तूंवर बंदी घालण्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली होती. त्यानंतर हा नियम राज्यभरात कमी अधिक प्रमाणात लागू करण्यात आला. दुधाच्या पिशव्यांचा वाद त्यानंतर बराच काळ सुरु होता. दुधाची पिशवी बंद झाली तर दूध कशातून देणार असा प्रश्न असल्याने दुधाची पिशवी बंद करायची का नाही असा प्रश्न होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या उद्योगाला नोटीस बजावून उत्पादन बंद करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे दुधाच्या पिशव्यांसाठी प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादनच न करण्याचा निर्णय उत्पादकांच्या संघटनेने घेतला आहे. त्यामुळे दूधसंकलनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. मात्र येत्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. प्लॅस्टिक पिशव्यांची विल्हेवाट तसेच त्याचा पुनर्वापर किंवा पुनर्प्रक्रिया करण्यासंदर्भात विशिष्ट मुदतीत आराखडा सादर करण्यात प्लास्टिक उत्पादकांना अपयश आल्यामुळे अखेर प्रदूषण मंडळाने पिशव्यांचे उत्पादन बंद करावे असे सांगितले.

असे असले तरीही येत्या गुरुवारी यासंदर्भातील बैठक होणार आहे. त्यामध्ये नेमका तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र १५ डिसेंबरपासून डेअरी उद्योगाला प्लॅस्टिक पिशव्यांचा पुरवठा न करण्याचा निर्णय ‘द महाराष्ट्र प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने घेतला आहे. या दुधाच्या पिशव्या दूध वितरकांनी ग्राहकांकडून जमा कराव्यात आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक ती योजना करावी असे सांगण्यात आले होते. प्लास्टिक पिशव्यांची विल्हेवाट, त्यांचा पुनर्वापर किंवा त्यावर प्रक्रिया करण्याबाबत सप्टेंबरअखेरपर्यंत आराखडा सादर करावा, असा आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादकांना दिला होता. मात्र असा आराखडा तयार करणे अशक्य असल्याने डेअरी उद्योगाला प्लॅस्टिक पिशव्या न पुरवण्याचा निर्णय २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात आला.