नांदेड : जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य राहण्यासाठी दंडाधिकारी या नात्याने जिल्हाधिकार्यांवर वेगवेगळे आदेश  पारित करण्याचा प्रसंग येतच असतो. पण नव्यानेच रुजू झालेल्या राहुल कर्डिले यांच्यावर एका घटनेमुळे नांदेड शहरात बाहेरून येणार्या व शहरातून बाहेर जाणार्या अश्ववर्गीय प्राण्यांची वाहतूक थांबविण्याचा आदेश जारी करण्याचा प्रसंग उद्भवला आहे.

अलीकडे नांदेड शहरातील एका घोड्यास ‘ग्लॅन्डर्स’ हा संसर्गजन्य आजार झाल्याचे आढळून आल्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने हरियाणातील प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले होते. त्या प्रयोगशाळेचा अहवाल फेब्रुवारीअखेरीस आला. त्यात वरील घोडा ग्लॅन्डर्सग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यास पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या शिफारशीने मारून टाकण्यात आले होते. या घटनेची तेव्हा कुठेही चर्चा झाली नाही.

यासंदर्भातील जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या आदेशाची माहिती माध्यमांकडे पाठविण्यात आल्यानंतर चौकशीअंती संपूर्ण माहिती समोर आली. ‘ग्लॅन्डर्स’ हा ससंर्गजन्य झुनोटिक रोग आहे. बुर्खोल्डेरिया मलेई या जीवाणूच्या संसर्गामुळे तो घोडे, खेचर आणि गाढव या अश्ववर्गीय प्राण्यांमध्ये आढळून येतो. एका घोड्याला त्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नांदेड शहराच्या १० कि.मी.पर्यंतच्या परिसरातील सर्वच अश्ववर्गीय प्राण्यांचे सर्वेक्षण करण्याचा प्रसंग उद्भवला आहे.

प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण कायदा २००९मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकार्यांनी वरील आदेश जारी केला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नांदेड शहरात येणार्या आणि शहरातून बाहेर जाणार्या अश्ववर्गीय प्राण्यांची वाहतूक करण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. नांदेडमध्ये घोडे पाळणारे शौकिन बरेच आहेत. शिवाय शहरात तबेला (अस्तबल) सुद्धा आहे. माळेगाव यात्रेत घोड्यांचा बाजार भरतो. तसेच लग्न वरातीमध्ये घोडे भाड्याने दिले जातात. त्यामुळे घोड्यांचे पालक बरेचजण आहेत. याच प्रमाणे अश्ववर्गीय प्रकारात गाढव सुद्धा येते. गाढवांची संख्या नांदेड मध्ये मोठ्या प्रमाणात असून प्रामुख्याने गौण खनिजाची वाहतूक व अन्य ओझ्याची कामे करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. या पार्श्वभूमीवर जिल्हा पशुवैद्यकीय विभागाच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताही अश्ववर्गीय प्राणी जिल्ह्यातून बाहेर नेण्यास व बाहेरुन जिल्ह्यात आणण्यास बंदी घातली आहे.

Story img Loader