ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना राजकीय नेत्यांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करताना बंडातात्या कराडकर यांनी सर्वच राजकीय नेत्यांची मुलं दारु पित असल्याचं सांगत पुरावे असल्याचाही दावा केला. दरम्यान यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंबाबात काही आक्षेपार्ह उल्लेख केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. यादरम्यान बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे.
कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा; बंडातात्या कराडकरांचं जाहीर आव्हान
साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.
बंडातात्यांचा माफीनामा
“ज्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला आहे त्यांच्याशी मी प्रत्यक्ष फोनवर बोललो आहे. माझं चुकलं असेल तर मी क्षमा मागण्यास तयार आहोत. आपल्या तोंडून काही चुकीचं असेल तर क्षमा मागण्यात कमीपणा नाही,” असं बंडातात्या प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
माझ्या वक्तव्यानं भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं म्हणत बंडातात्या कराडकर यांनी वादावर पडता टाकण्याचा प्रयत्न केला. मी काही आरोप केले आहेत, ते आरोप पूर्वग्रहदूषित नाही. चारही लोकांची मी क्षमा मागतो. पंकजा आणि सुप्रिया या दोघींचंही वर्तन चांगलं आहे. त्या दोघीही निर्व्यसनी आणि सदाचारी आहेत, असं मी कबूल करतो, असंही बंडातात्या म्हणाले आहेत.
बाळासाहेबांबरोबरच काही राजकीय लोकांची नावे घेतली. त्यांच्याबद्दल मला कुठलाही वैयक्तिक पूर्वआकस नाही. मी वैयक्तिक त्यांचा कधीही द्वेष करत नाही. त्यांच्याबद्दल मी याठिकाणी माफी मागतो. माझी विधाने अनावधानामधून आली आहेच. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करत आहे, असंही बंडातात्या कराडकर म्हणाले आहेत.
५० वर्षाच्या जीवनात माझं वैयक्तिक चारित्र्य प्रतिष्ठेचा विषय कधीच केला नाही. काही माणसं मर्यादेचं उल्लंघन करून माझ्यावर आरोप करत असतील. पण, माझ्या जीवनाची मला खात्री आहे. माझ्यावर अनेक आरोप आहेत. पण, मी ते माझ्या प्रतिष्ठेचं कारण समजत नाही, असंही बंडातात्या म्हणाले. काही लोक मी आरएसएसचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करतात. पण, मी कुठल्याही संघटनेचा कार्यकर्ता नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गुन्हा दाखल झाला नाही तर खटला दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे. तसंच राज्यभरात आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. दरम्यान प्रक्षोभक भाषण आणि बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर ?
बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं. तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असंही म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं.
उद्धव ठाकरे-अजित पवार ही ढवळ्या पवळ्याची जोडी – बंडातात्या कराडकर
वाइन विक्रीच्या निर्णयावरुन टीका
“विधानसभेत हा प्रश्न मांडला असता आणि मंजूर झाला असता तर अशा प्रकारचं आंदोलन करता आलं नसतं. पण मंत्रिमंडळातील मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्रावर दारुविक्रीचा हा अत्याचार लादला आहे. याविरोधात एकच संस्था तळमळीने काम करत आहे ती म्हणजे व्यसनमुक्त युवक संघ आहे. फक्त समाजाच्या कल्याणासाठी गेली २५ वर्ष आम्ही हे काम करत आहोत. आज शासनाला इशारा देण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
बंडातात्या कराडकर पुढे म्हणाले की, “लोकांवर भयंकर असा निर्णय लादण्यात आला आहे त्यावर आम्ही नाराज आहोत. अत्यंत शांततेत आम्ही आंदोलन करत होतो. हातात काठ्या असल्याने पोलिसांचा गैरसमज झाल्याने त्यांना रोखलं होतं. काठ्या बाजूला ठेवून आंदोलन करण्यास आंदोलनाची परवानगी दिल्याने आम्ही पोलिसांचे आभारी आहोत. आम्हाला आधी पुढे जाऊन देणार नसल्याचं कळलं होतं. हे आंदोलन येथे थांबणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रुप घेईल. त्यानंतर राज्य सरकारवर वाइन विक्रीची जी धुंदी चढली आहे ती कमी होईल आणि हा निर्णय मागे घ्यावाच लागेल”.
“उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार”
बंडातात्या यांनी भाषणात बोलताना उद्धव ठाकरे सरळमार्गी आहेत, मात्र ढवळ्याशेजारी पोवळा बांधला असा उल्लेख केला होता. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते म्हणाले की, “ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे”. यावेळी ढवळा कोण? पोवळा कोण? असं विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार असं ते म्हणाले.
“अजित पवारांनी दारु विकण्याचा गुण लावला. त्यांनीच मंदिरं खुली करायची नाहीत असं सांगितलं. हे सगळं अजित पवारांचं आहे. मी जाहीर सांगत असतो की ही सगळी मनमानी, दादागिरी..काय अजून लिहायचं असेल ते लिहा,” असंही ते म्हणाले.