सुपर मार्केट तसंच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाला विरोधकांसोबतच अनेक संस्थादेखील विरोध करताना दिसत आहेत. साताऱ्यात ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात याचे पुरावेदेखील असल्याचं यावेळी ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“विधानसभेत हा प्रश्न मांडला असता आणि मंजूर झाला असता तर अशा प्रकारचं आंदोलन करता आलं नसतं. पण मंत्रिमंडळातील मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्रावर दारुविक्रीचा हा अत्याचार लादला आहे. याविरोधात एकच संस्था तळमळीने काम करत आहे ती म्हणजे व्यसनमुक्त युवक संघ आहे. फक्त समाजाच्या कल्याणासाठी गेली २५ वर्ष आम्ही हे काम करत आहोत. आज शासनाला इशारा देण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं,” अशी माहिती यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीसंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले “हा चिंताजनक विषय…”

बंडातात्या कराडकर पुढे म्हणाले की, “लोकांवर भयंकर असा निर्णय लादण्यात आला आहे त्यावर आम्ही नाराज आहोत. अत्यंत शांततेत आम्ही आंदोलन करत होतो. हातात काठ्या असल्याने पोलिसांचा गैरसमज झाल्याने त्यांना रोखलं होतं. काठ्या बाजूला ठेवून आंदोलन करण्यास आंदोलनाची परवानगी दिल्याने आम्ही पोलिसांचे आभारी आहोत. आम्हाला आधी पुढे जाऊन देणार नसल्याचं कळलं होतं. हे आंदोलन येथे थांबणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रुप घेईल. त्यानंतर राज्य सरकारवर वाइन विक्रीची जी धुंदी चढली आहे ती कमी होईल आणि हा निर्णय मागे घ्यावाच लागेल”.

“नेत्यांची मुलं दारु पितात, माझ्याकडे पुरावे”

बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं. तसंच आपण नावं घेतली आहे त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असंही म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं.

“उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार”

बंडातात्या यांनी भाषणात बोलताना उद्धव ठाकरे सरळमार्गी आहेत, मात्र ढवळ्याशेजारी पोवळा बांधला असा उल्लेख केला होता. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते म्हणाले की, “ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे”. यावेळी ढवळा कोण? पोवळा कोण? असं विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार असं ते म्हणाले.

“अजित पवारांनी दारु विकण्याचा गुण लावला. त्यांनीच मंदिरं खुली करायची नाहीत असं सांगितलं. हे सगळं अजित पवारांचं आहे. मी जाहीर सांगत असतो की ही सगळी मनमानी, दादागिरी..काय अजून लिहायचं असेल ते लिहा,” असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandatatya karadkar on wine supermarket maharashtra cm uddhav thackeray deputy cm ajit pawar sgy
Show comments