राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर होऊ दोन दिवस उलटत नाही तेच नाराजांनी झेंडे फडकावले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानं राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या येवल्यातील पदाधिका-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच भुजबळांची उमेदवारी येथेच ठेवावी या मागणीसाठी शनिवारी “रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. येवला मतदारसंघाचे आमदार असलेल्या भुजबळ यांची उमेदवारी लोकसभेसाठी जाहीर होताच आम्हाला धक्का बसला असून येवल्यासारख्या मागासलेल्या मतदारसंघाला विकासाची दिशा मिळत असतानाच हा बदल झाल्याने लोकसभेची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी आंदोलनादरम्यान येवल्यातील कार्यकर्त्यांनी केली. आंदोलकांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे अर्धा तास नगर-मनमाड व नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.
भुजबळांनी येवल्याला वा-यावर सोडू नये, तुम्ही मतदारसंघ सोडला तर येवला तालुका हा पोरका होईल अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आल्या. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा अशी आग्रही मागणीसुद्धा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. अखेर आमदार पंकज भुजबळ व खासदार समीर भुजबळ यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन हा पक्षाचा व पवार साहेबांचा निर्णय असून भुजबळ कुटुंबीय येवलेकारांवर विकासात अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandh in bhujbals constituency over lok sabha ticket
Show comments