नक्षलवाद्यांना शस्त्रपुरवठा करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेले काँग्रेसचे नेते बंडोपंत मल्लेलवार यांचे प्रकरण राज्यभर गाजत असले तरी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना यातले काहीच ठाऊक नाही. ‘कोण मल्लेलवार, गुन्हा दाखल झाला का, आरोप काय आहेत,’ असे उलट प्रश्न त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना उपस्थित केले. यावरून काँग्रेस या प्रकरणाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच जिल्हा काँग्रेस समितीचे विद्यमान उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य असलेले मल्लेलवार यांच्यावर गेल्या २१ जूनला गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांना मदत करण्याच्या आरोपावरून अनेक गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. मल्लेलवार यांच्या सूचनेवरून आरोग्य खात्याची एक रुग्णवाहिका नक्षलवाद्यांना शस्त्र तसेच इतर साहित्य घेऊन जात असताना पोलिसांनी हे वाहन अडवून जप्त केले. तेव्हापासून मल्लेलवार फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस जंग जंग पछाडत आहेत.
छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्यांवरील हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोलीतील काँग्रेसचे नेतेच नक्षलवाद्यांना मदत करीत असल्याचे या प्रकरणातून समोर आल्याने माध्यमांमधून या पक्षावर टीका होत असली तरी या पक्षाचे राज्यातील नेते मात्र यातले काहीच ठाऊक नाही, असे भासवत असल्याचे माणिकराव ठाकरे यांच्याशी बोलल्यानंतर स्पष्ट झाले आहे. गेल्या २० दिवसांपासून फरार असलेल्या मल्लेलवारांना अजून पक्षाकडून कारवाईची कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. त्यांच्या हकालपट्टीच्या मुद्दय़ावर पक्षाचे नेते बोलायला तयार नाहीत.
या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’ने थेट ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोण मल्लेलवार, असा उलट प्रश्न उपस्थित केला. त्यावर या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिल्यानंतर ठाकरे यांनी खरेच गुन्हा दाखल झाला का, आरोप नेमके काय आहेत, हे ‘लोकसत्ता’कडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मल्लेलवार प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीवर असल्याची बाब निदर्शनास आणून दिली असता बघावे लागेल, असे उत्तर ठाकरे यांनी दिले. सर्वात शेवटी प्रकरणाची माहिती घेतो, असे ते म्हणाले. आता ठाकरे मल्लेलवारांची ओळखही नाही, असे दाखवत असले तरी हेच ठाकरे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना मल्लेलवार गडचिरोलीचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. विशेष म्हणजे ठाकरे विदर्भातील असून ते या भागातील सर्वच स्थानिक नेत्यांना ओळखतात. काँग्रेसचे नेते व या पक्षाचे मंत्री गडचिरोली दौऱ्यावर असताना नेहमी त्यांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहणारे मल्लेलवार आता या नेत्यांच्या विस्मरणात गेल्याचे बघून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. मल्लेलवार यांचा बचाव करण्यासाठीच प्रदेश पातळीवरचे नेते कानावर हात ठेवत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा