Dhananjay Munde vs Karuna Munde: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. त्यांचे आरोप वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने अंशतः मान्य केले आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना करुणा मुंडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, मी १५ लाख प्रति महिना पोटगी मिळावी म्हणून मागणी केली होती. मात्र न्यायालयाने दोन लाख पोटगी देण्याचा निर्णय घेतला आहे. पोटगी वाढवून मिळण्याबाबत उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान ही पोटगी करुणा मुंडे आणि त्यांच्या मुलीला वाटून देण्यात येणार आहे.
करुणा मुंडे पुढे म्हणाल्या की, मागच्या तीन वर्षांपासून मी खूप त्रास भोगला आहे. पोटगीसाठी मला खूप संघर्ष करावा लागला. पतीशिवाय एका महिलेला जीवन जगणे खूप अवघड असते. आपला पती जेव्हा उच्च पदावर असतो, तेव्हा पूर्ण व्यवस्था त्याच्याबाजूने काम करत असते. त्यांच्याकडे मोठे वकील होते. तरीही मी ही लढाई लढली. माझ्या वकिलांनी प्रामाणिकपणे लढून मला न्याय मिळवून दिला, याबद्दल मी त्यांचेही आभार मानते.
नेमकी किती पोटगी द्यावी लागणार?
खटल्याबाबत माहिती देताना करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांची मी पत्नी आहे की नाही? हे आधी आम्हाला सिद्ध करावे लागले. जे आमच्या वकिलांनी सिद्ध करून दाखवले आहे. करुणा मुंडे यांचे वकील गणेश कोल्हे यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले की, करुणा मुंडे यांना मासिक १ लाख २५ हजार आणि मुलीला लग्नापर्यंत मासिक ७५ हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आता मला करुणा मुंडेच म्हणा…
टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की, यापुढे माझा उल्लेख करुणा शर्मा नाही तर करुणा धनंजय मुंडे असा करावा. कारण न्यायालयाने मला पहिल्या पत्नीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मी मुंडे नावासाठी जी लढाई लढत होती, ती यशस्वी झाली आहे.