कराड: बांगलादेशातून पश्चिम बंगालमार्गे घुसखोरी करुन बनावट जन्म दाखला, आधारकार्ड तयार करुन एका बांगलादेशी महिलेने कराड तालुक्यातील शिरगाव (वडगाव) येथे वास्तव्य केल्याचे खळबळजनक प्रकरण पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिया रेहमान बिस्वास (वय ३३, मुळ रा. ग्राम गाजीरहट, पारमचोदूपूर जि. खुलना- बांगलादेश) ऊर्फ रिया सोहाक शेख ऊर्फ रिया विक्रम कदम सध्या रा. शिरगाव (वडगाव), ता. कराड) असे घुसखोरी करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधात उंब्रज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर महिलेने १२ वर्षांपासून भारतात अवैद्यरित्या पश्चिम बंगालमार्गे घुसखोरी करुन बनावट जन्म दाखला, आधारकार्ड तयार करुन वास्तव्य करत  असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा >>>रत्नागिरी : बंदी काळात मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर मत्स्य विभागाची कारवाई

पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय जयसिंग धुमाळ यांनी याबाबत उंब्रज पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, संशयित महिला ही शिरगाव (वडगाव) गावच्या हद्दीत वास्तव्य करत असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस  अधिकाऱ्यांना मिळाली, त्यांनी ही माहिती उंब्रज पोलिसांना कळवली. यावर वरिष्ठांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी पोलीस कॉन्स्टेबल साळे, धोंगडे, होमगार्ड गाडे, पाटील, जिल्हा विशेष शाखेचे जमादार भोसले यांचे पथक तयार करून पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. या पाहणीदरम्यान सदर पथकाला संशयित महिला मिळून आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत वरील बाबींचा उलगडा झाला आहे.

यामध्ये वसई, विरार, पनवेल, नवी मुंबई याठिकाणी वास्तव्य करत असताना, पहिल्या पतीने तिच्या नावाचा बनावट जन्म दाखला, आधारकार्ड अशी कागदपत्रे तयार करुन घेतली. त्यानंतर पहिल्या पतीने सोडल्यानंतर दुसरा पती विक्रम प्रकाश कदम रा. वडगाव (शिरगाव), ता. कराड याच्यासोबत वडगाव येथे अवैध्यरित्या वास्तव्य करुन पहिल्या बनावट कागदपत्रांच्या आधारे वडगाव, ता. कराड या पत्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड, एचडीएफसी बँकेचे खाते अशी कागदपत्रे तयार केली. त्याआधारे भारतीय नागरीक असल्याचे भासवून भारतात घुसखोरी करुन वास्तव्य करीत असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. यावरून उंब्रज पोलीस ठाण्यात संशयित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladeshi woman infiltrates lives with bogus documents in karad amy