बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. याआधीही त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला होता. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांनी ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनीच महंत सुनील महाराज यांच्या हाती शिवबंधन बांधलं.

उद्धव ठाकरेंचं संजय राठोडांवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र

“आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मला आनंद आहे. आपण म्हणत होतो की साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा. आता नवरात्रीतच सुनील महाराज इथे आले आहेत. बंजारा समाजाचे कडवट सैनिकही त्यांच्यासोबत आहेत. मध्यंतरी आम्ही संजय राठोडांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण यांना जेव्हा लक्षात आलं की ज्यांनी न्याय दिला, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला अशा लोकांसोबत आपण जाऊ शकत नाही. बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही. त्या निष्ठेनं ते शिवसेनेत आले आहेत. शिवसेना प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे याचं भवितव्य घडवण्याची. दसऱ्यानंतर मी महाराष्ट्रात फिरायला सुरुवात करणार आहे. पोहरादेवीलाही मी जरूर जाईन”, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

संजय राठोडांवर सुनील महाराज म्हणतात…

“संजय राठोडांसोबत आम्ही होतो. आता आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आणि शिवसेनेसोबत आहोत. त्यांना आम्ही पोहरादेवीला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यांनी ते स्वीकरलं आहे. आम्ही महाराष्ट्रात दौरा करणार आहोत. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन आहे. तेव्हा पूर्ण राज्यात बंजारा समाजातर्फे शिवसेवा संकल्प दौरा काढला जाणार आहे, अशी भूमिका यावेळी महंत सुनिल महाराज यांनी मांडली.

“आज पोहरादेवी येथे बंजारा समाजाची यात्रा आहे. तिथे दोन लाख बंजारा आहेत. त्या मुहूर्तावर मी उद्धव ठाकरेंना भेटायला आलो. मी मागेच म्हणालो होतो की नवरात्रीत मोठा निर्णय होणार. शुभ दिवस आहे. अतिशय सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत संपूर्ण राज्यातून दीड ते दोन कोटी बंजारा भाविक, समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, सत्तेत वाटा देण्यासाठी शिवसेनाच योग्य आहे, शिवसेनाच त्यांना न्याय देऊ शकते हे आमच्या लक्षात आलं. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे राहणार आहोत”, असं यावेळी सुनील महाराज म्हणाले.

“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर

संजय राठोडांना शह?

अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत महंत सुनील महाराज हे संजय राठोड यांचे समर्थक मानले जात होते. ठाकरे सरकारच्या काळात संजय राठोडांवर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यावेळी संपूर्ण बंजारा समाज संजय राठोडांच्या पाठिशी असल्याचं संगण्यात आलं होतं. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर संजय राठोड पहिल्यांदा यवतमाळमध्ये गेले, तेव्हाही मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं. मात्र, संजय राठोडांना मोठा पाठिंबा असलेल्या बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनाच शिवसेनेत प्रवेश देऊन उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांना शह दिल्याचं बोललं जात आहे.

Story img Loader