वाशीम : मंत्री संजय राठोडांना धक्का देत पोहरादेवी गडातील बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. बंजारा समाजाची काशी म्हणून परिचित असलेल्या पोहरादेवी गडातील बंजारा समाजाचे सुनील महाराज हे महंत आहेत. त्यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले.
मागील काही दिवसांपासून महंतासह बंजारा समाजाचे काही बांधव शिवसेनेत जाण्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. यातील महत्त्वाची चर्चा आज खरी ठरली आहे. या नवीन घडामोडीमुळे बंजारा समाजाच्या ‘काशी’तील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वत: सुनील महाराज यांनी शिवसेनेत जाण्याबाबत माहिती दिली होती. अखेर आज त्यांनी मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरादेवी सर्वश्रूत आहे. येथील महंतांना बंजारा समाजात मोठे स्थान आहे. बंजारा समाजाचे मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी शिवसेनेने महंत सुनील महाराज यांना शिवसेनेत घेऊन जोरदार धक्का दिल्याचे बोलले जात आहे.