पीककर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजात सवलत मिळते. पण जिल्हय़ात गेल्या ३ वर्षांत बेकायदा व्याजवसुली करीत बँकांनी शेतकऱ्यांकडून तब्बल ४० कोटी उकळले, असा आरोप भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनचे विश्वस्त अॅड. अजित देशमुख यांनी केला.
डॉ. पंजाबराव देशमुख पीक प्रोत्साहन व्याज सवलत अनुदान योजनेंतर्गत सरकार दरवर्षी पीक कर्जावरील व्याजात सवलत देते. सन २०११-१२ साठी जिल्हय़ातील सर्व बँकांनी १६ कोटी ८ लाख, २०१२ साठी २० कोटी १३ लाख, तर २०१३-१४ साठी १२ कोटींवर व्याज सवलत अनुदान लाटले. पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा येथील एका शेतकऱ्याची तक्रार भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाकडे आली. त्यांनी पाठपुरावा करीत शेतकऱ्यांच्या लुबाडणुकीचा प्रकार उघडकीस आणला.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मोहा शाखेत ४३० पात्र लाभार्थ्यांना साडेचार लाख, तर याच बँकेच्या सिरसाळा शाखेच्या १ हजार २५३ पात्र लाभार्थ्यांना व्याज सवलतीचे १७ लाख सहकार खात्यातर्फे आले होते. ही रक्कम कर्जावरील व्याज स्वरूपात बँकांना मिळाली. विशेष म्हणजे या बँकेने पूर्वीच शेतकऱ्यांकडून व्याज वसूल केले. व्याज सवलतीची रक्कम मिळाल्यावर तरी वसूल रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात बँकांनी जमा करायला हवी. मात्र, अजूनही ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. याचा पुरावाच जनआंदोलनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.

Story img Loader