रायगड जिल्ह्य़ातील अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाने २०१३-१४ साठी  १००६ कोटींचा पतपुरवठा आराखडा सादर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत हा आराखडा सादर करण्यात आला.
जिल्हास्तरीय पतपुरवठा आराखडय़ात प्राथमिक क्षेत्रासाठी १००० कोटींची तरतूद करण्यात आली. यात शेती क्षेत्रासाठी ३१० कोटींची भरीव तरतूद करण्यात आली. शेती क्षेत्रासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४८ कोटींची वाढ करण्यात आली. तर गृहनिर्माण आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी ६२१.९४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ७१.२४ कोटींची वाढ करण्यात आली आहे. तर एमएसएमई क्षेत्रासाठी ७३.५६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अलिबाग इथे जिल्ह्य़ातील ग्राहकांच्या सोयीसाठी अंचलिक कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.       या बैठकीला जिल्हाधिकारी एच. के. जावळे, बँक ऑफ इंडियाचे आंचलित प्रबंधक शिरीष कुलकर्णी, रिझव्‍‌र्ह बँकेचे साहाय्यक महाप्रबंधक एस. व्ही. धेंडे आणि अग्रणी बँकेचे प्रबंधक टी मधुसूदन उपस्थित होते. या वेळी पतपुरवठा आराखडा पुस्तिका आणि सीडीचे प्रकाशन करण्यात आले.