सोलापूर : महायुती सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या बँक खात्यातून योजनेची जमा रक्कम कर्ज वसुली किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव कपात करू नये, अशा शासनाच्या स्पष्ट सूचना असताना सोलापुरात काही बँका लाभार्थी महिलांच्या खात्यातून योजनेची जमा रक्कम कपात करीत असल्याचे आढळून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ स्पर्धा रविवारी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांच्या एकत्रित लाभाची रक्कम तीन हजार रुपये अंतिम पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहे. तथापि, या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणारी लाभाची रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या किंवा दंड वा अन्य कामाच्या बदल्यात समायोजित करू नये, ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती अन्य कोणत्याही कारणासाठी समायोजनाकरिता परस्पर हस्तांतरित करता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना शासनाने यापूर्वीच दिल्या आहेत. याच अनुषंगाने सोलापुरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही बँकांच्या बैठकीत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तथापि, या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणारी लाभाची रक्कम थकीत कर्ज किंवा अन्य कारणासाठी परस्पर वळवली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

बँकेविरुद्ध कारवाईचे आदेश

घरातील होटगी रस्त्यावर एका राष्ट्रीयीकृत बँकेत शासनाच्या सूचना डावलून असा प्रकार गुरुवारी पुन्हा उजेडात आला आहे. एका लाभार्थी महिलेच्या बँक खात्यावर योजनेच्या लाभाची दोन महिन्यांची एकत्रित तीन हजार रुपयांची रक्कम जमा झाली असता संबंधित महिला लाभार्थी ही रक्कम काढण्यासाठी बँकेत गेली. तेव्हा तिला धक्का बसला. तिच्या खात्यात लाभाच्या तीन हजार रुपयांपैकी फक्त ६७.९४ रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. संबंधित लाभार्थी महिलेने बँकेत चौकशी केली असता खात्यात किमान रक्कम १०० रुपये अनिवार्य असून ते न ठेवल्याने मागील दोन वर्षांचा दंड आणि त्यावरील व्याज अशी रक्कम कपात झाल्याचे स्पष्टीकरण बँकेने दिल्याचे संबंधित लाभार्थी महिलेचे म्हणणे आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतची चौकशी करून संबंधित बँकेविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banks in solapur deducting money from amount deposit under ladki bahin yojana of beneficiary women zws