संगमनेर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांची आज अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे जाहीर सभा पार पडली. दुष्काळी पारनेर तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी सभेदरम्यान बॅनर फडकवत ‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ अशी घोषणाबाजी केली. सभेत व्यक्ती आणल्याने संतापलेल्या पवार यांनीही ‘आम्ही कुठे म्हणतो आमच्या बापाचं? असा प्रतिसावाल करत सभेत व्यत्यय आणू नका असे सांगितले.

पारनेरच्या बाजार तळावर आज, शनिवारी दुपारी चार वाजता झालेल्या सभेत भूमिपूत्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली घोषणाबाजी आणि त्यांच्याशी संवाद साधत अजितदादांनी दिलेले उत्तर या चर्चेने उपस्थितांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले. घोषणा देणाऱ्यांशी संवाद साधताना अजितदादा म्हणाले, मी पण शेतकरी आहे. मला पण फार कळतंय. तुम्हाला लंकेंनी ( खासदार निलेश लंके ) इकडे पाठवलं काय ? ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असतात. यावर संबंधित आंदोलकांनी आम्ही पहिले तुमचेच कार्यकर्ते आहोत असे सांगताच, ‘ माझ्या कार्यकर्त्यांना मी असा व्यत्यय आणायला सांगत नाही. तुम्ही खाली बसा ‘ असे सांगत अजितदादांची गाडी ‘आपण लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिले’ इकडे वळली.

हेही वाचा – भाजप प्रदेश कार्यालयातून प्रसिद्धीमाध्यमे तडीपार ?

पार्श्वभूमी :

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका हा सातत्याने दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. शेजारच्या पुणे जिल्ह्यात भरपूर धरणे आणि पाणी, मात्र पारनेर कोरडा ठाक असे चित्र आहे. पाण्यापासून वंचित असलेल्या पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार परिसरातील गावांना कुकडी प्रकल्पातून किमान एक टीएमसी पाणी द्यावे अशी इथल्या जनतेची साधारण १९७०- ७५ पासूनची मागणी आहे. स्वतः पठार भागातील असलेले पारनेरचे तत्कालीन आमदार कॉम्रेड बाबासाहेब ठुबे यांनी पठार भागाला पाणी मिळावे यासाठी मोठा पाठपुरावा केला. वेळप्रसंगी तीव्र स्वरूपाची आंदोलनेही केली. परंतु त्यांचा लढा देखील हा प्रश्न सुटण्यापर्यंत पोहोचू शकला नाही. तेव्हापासून आजतागायत झालेल्या प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आलेल्या मोठमोठ्या नेत्यांनी ‘यावेळी आम्हाला साथ द्या, आम्ही तुम्हाला एक टीएमसी पाणी देऊ’ असे आश्वासन देत निवडणुकाही जिंकल्या. त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांसह खासदार शरद पवार ते अजित पवार यांचाही समावेश आहे. दर निवडणुकीत आश्वासन मिळते, परंतु आजतागायत कुकडीचे पाणी पारनेर तालुक्याला मिळाले नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील अजित पवार यांनी पारनेर तालुक्याला पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही कुठलीच कारवाई झाली नाही.

हेही वाचा – उल्हासनगरच्या आखाड्यात यंदा मोठा संघर्ष

दरम्यान पारनेर तालुक्यातील जनतेने विशेषत: पठार भागातील कार्यकर्त्यांनी पाण्याचे आंदोलन तीन-चार वर्षांपासून पुन्हा जिवंत केले आहे. वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या संघटनांचा सातत्याने लढा चालू आहे, परंतु त्याला कुठेही दाद मिळत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पवारांच्या सभेदरम्यान भूमिपूत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, जिल्हा संघटक संतोष वाबळे, या आंदोलनातील जुने कार्यकर्ते वसंत शिंदे, वसंत साठे, विशाल करंजुले, संजय भोर या कार्यकर्त्यांनी घोषणा देत अजितदादांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

Story img Loader