सावंतवाडी: कणकवली मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलाथापालथ सुरु आहे. असं असतांना अचानक राजकीय दृष्ट्या संवेदनशील कणकवली तालुक्यात “श्रीधर नाईक अमर रहे”, “सत्यविजय भिसे अमर रहे”, आजचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील काळा दिवस असा उल्लेख असलेले बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. नुकतेच ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली यांना उद्देशून हे बॅनर असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कणकवली शहरासह कणकवली तालुक्यात नांदगाव, तरेळे, कासार्डे याठिकाणी लावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या बॅनर वर “आजचा सत्कार, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील काळा दिवस” असा उल्लेख करत या बॅनर वर “श्रीधर नाईक अमर रहे” “सत्यविजय भिसे अमर रहे” असा उल्लेख केलेला आहे. “सत्यविजय भिसे आम्हाला माफ करा” असा देखील उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाकडून कणकवली भगवती मंगल कार्यालय माजी आमदार परशुराम उपरकर व माजी आमदार राजन तेली यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराचा संदर्भ या बॅनरवर घेत विविध बॅनर लावण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
श्रीधर नाईक हत्येच्या गुन्ह्यात त्यावेळी परशुराम उपरकर संशयित आरोपी होते. मात्र त्यानंतर ते सदर केस मध्ये निर्दोष सुटले होते. तर सत्यविजय भिसे केस मध्ये देखील राजन तेली हे संशयित आरोपी होते. मात्र ते देखील या केस मध्ये निर्दोष सुटले होते. त्यामुळे उपरकर व तेली यांच्या सत्कारावर भाष्य करणारे बॅनर असल्याची चर्चा आहे. तेव्हा ठिकठिकाणी हे बॅनर कोणी लावले याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.