देशभरात, प्रामुख्याने दिल्ली व कर्नाटकात चोरीचे पाचशेपेक्षा जास्त गुन्हे करून पोलिसांची झोप उडविणारा ‘बंटीचोर’ शनिवारी पुणे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. एका लॉज मालकाच्या जागरूकतेमुळे त्याला पोलिसांनी पकडले. पाच दिवसांपूर्वी केरळमधील अनिवासी भारतीयाच्या बंगल्यात चोरी करून त्यांची आलिशान मोटार घेऊन पोबारा केल्याच्या प्रकरणात सध्या पोलीस त्याचा शोध घेत होते. या बंटीचोरावर एक हिंदूी चित्रपटही निघाला असून, त्याने ‘बिग बॉस’ या कार्यक्रमातही यापूर्वी सहभाग घेतला आहे. अशा या ‘सेलिब्रिटी’ चोराला पुणे पोलिसांनी केरळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
देवेंद्रसिंग ऊर्फ बंटी कृपासिंग ऊर्फ बंटीचोर (वय ४१, रा. गल्ली नंबर आठ, करवालनगर, दिल्ली) असे त्या चोराचे नाव आहे. त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, कपडे व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी दिली. ते म्हणाले की, मंगळवार पेठेतील श्री साई एक्झिक्युटिव्ह लॉजचे मालक विजय माने यांना त्यांच्या लॉजवर एक संशयित व्यक्ती उतरल्याची दिसली. केरळ येथील पेरूकेडा या ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्य़ातील आरोपी बंटीचोराचे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले छायचित्र आणि ही व्यक्ती सारखीच दिसत होती. त्याबाबत खात्री झाल्यानंतर त्यांनी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत निकम, भगवंत इंगळे व सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. मंडले यांना ही माहिती दिली.
त्यानुसार, मंडले यांनी पहाटे चारच्या सुमारास या लॉजवर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पाच ते सहा दिवसांपूर्वी केरळ येथे त्रिवेंद्रम, बंजारा हिल, या ठिकाणी एका अनिवासी भारतीयाची आलिशान मोटार चोरली. ही मोटार चेन्नईकडे घेऊन जात असताना पोलिसांनी पाठलाग सुरू केला. त्यामुळे त्याने मोटार कर्नाटकात सोडली. त्यानंतर बेळगावमार्गे बसने तो कोल्हापूर व नंतर पुण्यात आला. या प्रकरणी बंटीवर तिरुअनंतपूरम येथील पेरुकडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे, असे दैठणकर यांनी सांगितले.
देशातील अनेक पोलीस ठाण्यात बंटीवर गुन्हे दाखल आहेत. दिल्ली येथे त्याच्या एकटय़ावर तीनशे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच बरोबर कर्नाटकात शंभर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. बॉलीवूडमधील चित्रपट दिग्दर्शक दिवाकर बॅनर्जी यांनी या बंटीचोराच्या जीवनावर ‘ओ लकी ओय’ हा चित्रपट काढला आहे.
त्याच बरोबर ‘बिग बॉस’ च्या चौथ्या भागात त्याने सहभाग घेतला होता. दिल्ली येथे प्रत्येक पोलीस ठाण्यात त्याचे छायाचित्र लावण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी बंटीला २००२ मध्ये चोरीच्या गुन्ह्य़ात पकडल्यानंतर त्याच्याकडून चार कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला होता. चोरीच्या गुन्ह्य़ात तीन वर्षे शिक्षा झाली होती. ती भोगून तो २०१० मध्ये बाहेर पडला होता. मार्च २०११ मध्ये बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
‘इंडियन एक्सप्रेस’ च्या वृत्तामुळे बंटीचोर जाळ्यात
केरळात एका व्यापाऱ्याची मोटार चोरल्यानंतर पोलीस पाठलाग करत असल्यामुळे त्याने आपली मोटार कर्नाटकात सोडून दिली होती. त्यामुळे तो कोठे गेला आहे, याची काहीच माहिती पोलिसांना नव्हती. या चोरीच्या घटनेची बातमी ‘इंडियन एक्सप्रेस’ मध्ये बंटीचोराच्या फोटोसह दिली होती. हा बंटीचोर पुण्यातील श्री साई एक्झिक्युटिव्ह लॉजमध्ये राहिला होता. या लॉजचे मालक विजय माने यांनी ही बातमी वाचली. त्यांना बातमीतील फोटो व याच्यात साम्य वाटले. त्यांनी त्याचे ओळखपत्र पुन्हा पाहिले. त्याच्यावरील फोटो व बातमीतील फोटो ताडून पाहिल्यानंतर हा तोच आरोपी असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. लॉजमध्ये पकडण्यासाठी पोलीस आले त्यावेळी हा बंटीचोर त्याचीच बातमी एका वृत्तवाहिनीवर पाहात बसला होता.