बाळासाहेब जवळकर, पिंपरी
बारामती म्हणजे पवारांचा अभेद्य बालेकिल्ला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी तब्बल सहा वेळा बारामती लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. पवारांच्या उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांनी बारामतीची धुरा खांद्यावर घेतली. २००९ मध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवणाऱ्या सुळे यांना गेल्या वेळी निवडून येताना बरेच झगडावे लागले. आता बारामतीची जागा राखण्याबरोबरच चांगले मताधिक्य मिळविण्याचे आव्हानच राष्ट्रवादी तसेच सुप्रियाताईंसमोर असेल.
मराठा आणि धनगर समाजाचे प्राबल्य असणाऱ्या बारामती लोकसभा क्षेत्रात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला आणि भोर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. आयटी हब हिंजवडीचा परिसरही याच मतदारसंघात समाविष्ट आहे. सुरुवातीला काँग्रेसचा व १९९९ पासून पुढे राष्ट्रवादीचा गड म्हणून बारामती मतदारसंघ प्रसिद्ध आहे. २००९ मध्ये शरद पवारांनी बारामतीऐवजी माढा मतदारसंघ निवडल्यानंतर सुप्रिया सुळे यांना बारामतीतून रिंगणात उतरवण्यात आले. तेव्हाच्या लढतीत सुळे यांनी भाजपच्या कांता नलावडे यांचा दारुण पराभव केला. पुढे, २०१४च्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचा पराभव केला असला, तरी मताधिक्य त्यांना राखता आले नाही. किंबहुना सुळे निवडून येतील की नाही, इतपत वातावरण तेव्हा झाले होते. अटीतटीच्या या लढतीत सुळे या ६९ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या. मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभेच्या क्षेत्रात जानकरांनी आघाडी घेतली होती. मात्र, बारामती, इंदापूर विधानसभेतून मिळालेल्या निर्णायक आघाडीमुळे सुप्रिया सुळे यांचा पराभव टळला. जानकरांना कमळ चिन्ह न घेण्याचा अट्टहास महागात पडला. मोदी लाटेचा लाभ त्यांना झाला नाही. असा निष्कर्ष नंतर काढण्यात आला. नुकतेच पुण्यात बारामती, शिरूर व पुणे लोकसभेसाठी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळावा झाला, तेव्हा बारामतीत यंदा कमळ फुलवणार, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. सुळे यांच्यासमोर जो कोणी उमेदवार असेल त्यास भाजपचेच चिन्ह घ्यावे लागेल, असेच याद्वारे सूचित करण्यात आले. बारामती किंवा माढा मतदारसंघातील उमेदवारी स्वीकारण्याची तयारी जानकर दाखवली आहे. तथापि, भाजपने उमेदवारीचे संकेत अद्याप दिलेले नाहीत. बारामतीत जानकर यांना गेल्यावेळी असणारे पोषक वातावरण यंदा जाणवत नाही. धनगर आरक्षणाचा निर्णय न झाल्याने या समाजात सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. मात्र, साडेचार वर्षे उलटून गेल्यानंतरही आरक्षणाचा विषय जैसे थे आहे. याचे भाजपविरोधकांनी चांगलेच राजकीय भांडवल केले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव असायचा. आता परिस्थिती बदलली आहे. बारामती विधानसभेतून अजित पवार आणि इंदापूरमधून दत्तात्रय भरणे हे दोनच राष्ट्रवादीचे आमदार आहेत. दोन्हीही मतदारसंघात तीव्र पवारविरोध जाणवतो. काँग्रेसचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कार्यक्षेत्र इंदापूर आहे. मोठय़ा पवारांशी पाटलांचा सुसंवाद असला तरी, अजित पवारांशी त्यांचे सातत्याने खटके उडताना दिसतात. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत इंदापूर विधानसभा कोणाकडे राहणार, हा अत्यंत कळीचा मुद्दा असून त्याचे सावट बारामती लोकसभेच्या राजकारणावर राहणार आहे. भोरमधून काँग्रेसचे संग्राम थोपटे आमदार आहेत. पवारविरोधी म्हणूनच थोपटे घराण्याची जिल्ह्य़ाच्या राजकारणात ओळख आहे. पुरंदरमधून शिवसेनेचे विजय शिवतारे निवडून आले. खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर निवडून आले आहेत. दौंड तालुक्यात रासपच्या राहुल कुल यांनी राष्ट्रवादीच्या रमेश थोरातांचा पराभव केला होता.
बारामतीच्या अनेक संस्था वर्षांनुवर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. सत्तेच्या माध्यमातून भाजप बारामतीत हळूहळू पाय पसरू लागला आहे. बारामतीजिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे. अगदी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा बारामतीच्या भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गेल्या निवडणुकीतील अनुभवातून धडा घेत सुळे यांनी मतदारसंघातील संपर्क वाढवला आहे. लेकीसाठी पवारांनी स्वत:ही बारामतीत लक्ष घातले आहे.
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे जनकार्याचे सूत्र डोळ्यासमोर ठेवूनच माझी वाटचाल सुरू आहे. रस्ते, पाणी, वीज या सर्वसामान्यांशी निगडित प्रश्नांवर मतदारसंघांमध्ये कोटय़वधी रुपयांची कामे केली. बारामती हे विकासाचे मॉडेल म्हणून देश-विदेशात प्रसिद्ध आहे. सातत्याने पाठपुरावा केल्याने बारामतीमध्ये पासपोर्ट कार्यालय आणि पोस्टल बँकिंग सेवा सुरू झाली. मतदारसंघांतील सर्व अंगणवाडय़ांना वीज आणि पाणी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. फुरसुंगी आणि उरळी देवाची कचरा डेपो प्रश्नाबाबत प्रशासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला. लोकसभेत ११७१ प्रश्न, २२ खासगी विधेयके, १४७ चर्चामध्ये सक्रिय सहभाग घेतला. अधिवेशनांमधील एकूण उपस्थिती ही ९६ टक्के होती. संसदीय कामगिरीमुळेच सलग पाच वेळा संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा-मुळशी, बारामती, दौंड आणि खडकवासला या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासकामे केली. फक्त रस्त्यांसाठी ९०० कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली.
– खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>
शरद पवार यांची कन्या, हीच सुप्रिया सुळे यांची ओळख आहे. त्यांचे स्वत:चे कर्तृत्व काय आहे. खासदार म्हणून छाप पाडण्यात त्या अपयशी ठरल्या आहेत. त्यांच्या खासदारकीचा उपयोग ना जनतेला, ना मतदारसंघाला झाल्याचे दिसते. कोणताही प्रकल्प त्यांना आणता आला नाही. रेल्वेचे काम केल्याचे वर्षांनुवर्षे नुसते ऐकतोच आहे. लोकसभेत त्या धोरणात्मक बाबींवर भूमिका मांडत असतील, मात्र मतदारसंघाचे प्रश्न त्यांना सोडवता आले नाहीत. त्या नेहमी दुसऱ्यांवर टीका करतात. त्यांनी स्वत:देखील काहीतरी करून दाखवले पाहिजे. सायकली वाटप करणे, आरोग्य शिबीर घेणे ही खासदारांची कामे नव्हेत. जिल्हा परिषदेने केलेल्या कामांचे श्रेय सुळे यांनी घेण्याचे काहीच कारण नाही. त्यांनी स्वत: केलेली कामे दाखवावीत.
– राज्यमंत्री विजय शिवतारे, पुरंदर (शिवसेना)
बारामती आणि पवार
बारामती मतदारसंघात आतापर्यंत पवार आणि काँग्रेस व पुढे राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. १९७७ आणि १९८५ मधील पोटनिवडणुकीत जनता पक्षाचे संभाजीराव काकडे यांचा अपवाद वगळल्यास पवार किंवा काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. भाजपने बारामती जिंकण्याचा निर्धार केला असला तरी बालेकिल्ल्यात पवार कुटुंबीयांचा पराभव करणे सोपे नाही. पण भाजपचा सूर लक्षात घेता सुप्रियाताईंनी सध्या मतदारसंघातच ठाण मांडली आहे.
कळीचे मुद्दे : धनगर समाजाचे आरक्षण, विकासकामांचा श्रेयवाद, रेल्वेशी संबंधित प्रश्न, जिराईती तसेच बागायती शेतीचे प्रश्न, पाण्याची तीव्र टंचाई, साखर कारखान्यांचे राजकारण, रोजगार, हमीभाव आणि आयटी हब हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीसह इतर महत्त्वाचे प्रश्न.