राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणूक पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. ही निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज सातत्याने वर्तविला जात होता. मात्र मतमोजणीत सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे अजित पवार यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभा निकालाच्या प्रतिक्षेत असताना सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानते. उद्या मी बारामतीला जाणार. संघर्ष! आयुष्यात कधीही खचून जायचं नाही. हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर माझ्या जीवनातलं सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब. ज्या दिवशी हे सगळं घडलं आणि आजचा दिवस हे दहा-अकरा महिने कसे गेले हे माझं मलाच माहिती आहे. आणि त्यातून लोकांनी जी साथ दिली, जो विश्वास दाखवला त्यामुळे जबाबदाऱ्या आमच्या सर्वांच्याच खूप वाढल्या आहेत.

हेही वाचा : कोकणात पुन्हा नारायण राणेंचाच बोलबाला, विनायक राऊतांचा केला दणदणीत पराभव

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला वाटतं जबाबदाऱ्या आणि जी काही प्रकरणं या निवडणुकीत झाली आहेत, ती महाराष्ट्राला न शोभणारी आहेत आणि ती आता विधानसभेला होऊ नये. यासाठी आमच्याकडून तर पूर्ण खबरदारी घेतली जाईल. निवडणुकीत असताना महाराष्ट्राची आणबाण आणि शान, संस्कृती ही जपण्याची जबाबदारी सगळ्यांवरच असते. आम्ही या निवडणुकीत ती जपली आणि पुढेही जपू. मला असं वाटतं हे लोकांचं यश आहे. कार्यकर्ते जे आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे आहेत, आमच्याकडे काही नव्हतं द्यायला तरी कार्यकर्ते पाठीशी राहिले. हे त्यांचं यश आहे.

हेही वाचा : आता शिंदे-फडणवीस सरकारचा भ्रष्टाचार जनतेसमोर मांडणार, काँग्रेसची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू

पहिल्या फेरीपासूनच सुप्रिया सुळेंची आघाडी

बारामती लोकसभा निवडणुकीची सुळे आणि पवार यांच्यातील ही लढत पहिल्यापासूनच भावनिक ठरली होती. बारामती मध्ये वर्चस्व कोणाचे हे ठरविणारी ही निवडणूक ठरली होती. त्यामुळे आरोप- प्रत्यारोपांमुळे गाजलेल्या या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाल्यानतर पहिल्या फेरीपासूनच सुळे यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले.