सोलापूर : चालू २०२४-२५ आर्थिक वर्ष संपण्यास अवघे १२ दिवस उरले असून, या तेरा दिवसांत २०४ कोटी रुपयांची वसुली करण्याचा इष्टांक महावितरणने ठेवला आहे.प्रत्येक अभियंता व लाईनमन यांना हे उद्दिष्ट विभागून देण्यात आले असून, वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिल तातडीने भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी केले आहे.
बारामती परिमंडलात लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांकडे सुमारे ११२ कोटींची थकबाकी आहे. तर चालू महिन्याची मागणी २५७.५३ कोटी असे मिळून मार्च महिन्यात बारामती परिमंडलास ३६९.४६ कोटी वसुलीचे उद्दिष्ट सांघिक कार्यालयाकडून देण्यात आले आहे. १९ दिवसांत केवळ १६६ कोटी रुपये वसूल झाले असून, हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ४४.९३ टक्के इतकेच आहे. त्यामुळे उरलेल्या १२ दिवसांत वसुलीचा वेग वाढवावा लागणार असून, कोणत्याही परिस्थितीत २०४ कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य गाठणार असल्याचे पेठकर यांनी सांगितले.