बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं जाणार आहे. याबाबतची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. राज्य सरकारने त्यासंबंधीचं परीपत्रक जारी केलं आहे. काही वेळापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहिल्यादेवी होळकर नगर केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यापाठोपाठ आता बारामतीतल्या वैद्यकीय महाविद्यालयाला आहिल्यादेवींचं नाव देण्याचा निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती या संस्थेचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती असे नामाधिकरण करण्यात येत आहे. त्या अनुनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांनी करावी, असा आदेश परिपत्रकात देण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात आज पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त आज आहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहिल्यादेवी होळकर नगर असं व्हावं ही इच्छा व्यक्त केली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच त्यांच्या भाषणात घोषणा केली की, सर्वांची इच्छा आहे, त्यामुळे आपण अहमदनगरचं नाव बदलून आहिल्यादेवी होळकर नगर असं केलं जाणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baramati medical college named after ahilyadevi holkar says girish mahajan asc