शिवसेना नेमकी कुणाची? याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून या सुनावणीसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. दोन्ही बाजूचे नेते या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटावर टीका केली आहे.
अरविंद सावंत म्हणाले, “मिंधे गटाने मांडलेली बाजु हास्यास्पद! आश्चर्य वाटतंय, देशात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? लोकशाही जीवंत आहे की नाही? आम्हीं सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली आहे आणि मुळात जे वाद घालणारे आहेत ते स्वत: कायदेशीर तरी आहेत का?”
हेही वाचा – “फक्त आमदार आणि खासदार मिळून शिवसेना निर्माण होत नाही” अंबादास दानवेंचा शिंदे गटाला टोला!
याशिवाय, “पक्ष रजिस्टर्ड आहे? त्यांनी विधानसभेतही सर्व स्पष्ट सांगितले कसे केले ते… तो पक्षद्रोह नव्हता? मुळात त्यांच सदस्यत्वच रद्द होतंय. तीच खरी मागणी आहे, ते अपात्र व्हायला हवे.” असंही अरविंद सावंत म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदार आणि १३ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. मात्र, एवढा मोठा गट फुटून बाहेर पडल्यामुळे खरी शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाची की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाची? हा वाद निर्माण झाला. त्यासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या गटानं निवडणूक आयोगासमोर केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असून त्यावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद केला जात आहे.