रत्नागिरी :  रत्नागिरी शहराजवळील मिऱ्या किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला अडथळा ठरलेले बसरा हे जहाज लवकरच भंगारत काढण्यात येणार आहे. ३५ कोटीचे हे जहाज अवघ्या दोन कोटीला भंगारात काढण्यात येणार आहे. याबाबत केंद्र शासनाची परवानगी घेण्याचे काम मेरीटाईम बोर्डाकडून सुरू करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिऱ्या किनाऱ्यावर  चक्रीवादळामुळे बसरा स्टार जहाज अडकून पडले आहे. मागील पाच वर्ष हे जहाज याच ठिकाणी अडकून पडलेले आहे. मात्र आता हे जहाज  काढण्याच्या हालचालीना वेग आला आहे. बसरा हे जहाज ३५ कोटींचे असून अवघ्या दोन कोटींमध्ये भंगारात काढले जाणार आहे. याबाबत एम. एम. शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीचे आतिफ सोलकर  हे सीमाशुल्क व मेरिटाईम बोर्डाशी पत्रव्यवहार करत असून ५०० मेट्रिक टन वजनाचे हे जहाज येत्या १५ दिवसांत परवानगी मिळाल्यावर भंगारात काढले जाणार आहे.

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम या बसरा स्टार जहाजामुळे रखडलेले होते. मात्र याठिकाहून हे जहाज हलविल्यास बंधाऱ्याचे काम मार्गी लागणार आहे.  त्यामुळे पतन विभागाने याबाबत मेरिटाईम बोर्ड आणि कस्टम विभागाला जहाज काढण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.बसरा हे जहाज दुबईहून मालदीपला जात असताना ३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने मिऱ्या येथील समुद्र किनारी अडकून पडले आहे. या जहाजामध्ये १३ क्रुजर कर्मचारी होते. मेरीटाईम बोर्ड, पोलीस आणि  तटरक्षक दलाच्या मदतीने रेस्क्यू करून यातील १३ जणांचा जीव वाचविण्यात यंत्रणेला यश आले होते.

याठिकाणी अडकलेले हे जहाज काढण्याबाबत दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क करण्यात आला असून  त्यांनी ४० लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर ते भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्र शासनाची भंगारात काढण्याबाबत परवानगी मिळाल्यानंतर कस्टम विभाग या जहाजाचे मूल्यांकन करणार असल्याचे  मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Basra ship worth rs 35 crore to be scrapped for rs 2 crore waiting for central government permission amy