आशापुरापाठोपाठ आता मंडणगडातील कंपनीही अडचणीत
बॉक्साइट उत्खननाबाबत अडचणीत आलेल्या ‘आशापुरा’पाठोपाठ गुडेघर येथील आयएलपीएल कंपनीविरोधातही स्थानिकांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने बांधलेल्या जेटीमुळे मच्छीमारांचे नुकसान होत असल्याने आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
आशापुरा कंपनीच्या बॉक्साइट उत्खननामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याच्या विरोधात प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर ही कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. दोन महिने या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर बॉक्साइटची वाहतूक करणारा कंपनीचा ‘कन्व्हेयर बेल्ट’ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निकालाने स्थानिक नागरिकांमध्ये महसूल यंत्रणेबाबत विश्वास वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे गुडेघर येथील बॉक्साइट उत्खनन करणाऱ्या आयएलपीएल कंपनीमुळे होणाऱ्या नुकसानीबाबतही आता स्थानिकांनी आवाज उठवला आहे.
गुडेघर येथे बॉक्साइट उत्खनन केल्यानंतर आयएलपीएल कंपनी उमरोलीमाग्रे हा साठा परदेशी निर्यात करते.
यासाठी उमरोली येथे खाडीकिनारी कंपनीने जेटी बांधली आहे. या जेटीवरून मोठमोठे बार्ज ये-जा करतात. ही जेटी नियमबाह्य़ असून त्याची पुनर्तपासणी करण्याची मागणी स्थानिक मच्छीमारांनी केली आहे. तसे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.
जेटीवर ये-जा करणाऱ्या बार्जवरील कर्मचारी प्रशिक्षित नसल्यामुळे होडय़ांचे व मच्छीमारांनी पसरलेल्या जाळ्यांचे संदेश त्यांना लक्षात येत नाहीत. यामुळे होडय़ांसह जाळ्यांना धोका निर्माण होत आहेत. त्यातून मच्छीमारांचे नुकसानीचे प्रकार वाढत असून या बार्जची तपासणी करावी आणि नियमबाह्य़ अप्रशिक्षित कर्मचारी भरती करणाऱ्या बार्जची परवानगी रद्द करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. नवीन जिल्हाधिकारी प्रदीप पी. याबाबत काय कारवाई करतात, याकडे आता स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा