मुंबई पुरातन वारसा जतन समितीने हेरिटेज वास्तूंच्या यादीत शहरातील बीडीडी चाळींचा समावेश केला असला तरी त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे आल्यानंतर या चाळी हेरिटेजच्या यादीतून वगळण्यात येतील. तसेच बीडीडी चाळी आणि उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाबाबतचे धोरण येत्या महिनाभरात तयार करण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारने बुधवारी विधान परिषदेत केली.
 बीडीडी चाळींचा ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत समावेश करण्यात आल्यामुळे त्यांच्या पुनर्विकासास खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याबाबत  सभागृहात जोरदार चर्चा झाली. मुंबईत ९१ एकर जागेत २०७ बीडीडी चाळी असून, १२ चाळी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर आहेत. ९० वर्षांहून जुन्या असलेल्या या इमारतींचा पुनर्विकास महत्त्वाचा असून मुंबई पुरातन वारसा जतन समितीने या चाळींचा समावेश ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत श्रेणी तीनमध्ये केला आहे. त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या असून, त्यावर मुंबई महापालिका अंतिम निर्णय घेईल. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे येईल त्या वेळी ऐतिहासिक वास्तूंच्या यादीतून बीडीडी चाळी वगळण्यात येतील, अशी ग्वाही गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिली.

Story img Loader