धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी
नितीन बोंबाडे, लोकसत्ता
डहाणू : वाढवण टिघरेपाडा या समुद्रकिनाऱ्याची मोठय़ा प्रमाणात धूप सुरू आहे. किनारा परिसरातील सुरूच्या बागेतील झाडे संपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. खाडीचे पात्र अरुंद झाल्याने भरतीला समुद्राचे पाणी थेट गावात शिरत असल्याने यंदाही धोका निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून धूपप्रिबंधक बंधारा बांधण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
समुद्रकिनारी सुरुच्या आणि माडाची झाडे आहेत. ही झाडेही उन्मळून पडत आहेत. समुद्राची वाळू आजूबाजूला पसरून जमीन नापिक बनत चालली आहे. भरतीचे पाणी गावात शिरल्याने गावातील पाण्याचे स्रोत खारे बनले आहेत. वाढवण नजीकच्या वरोर, चिंचणी, गुंगवाडा समुद्रकिनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, वाढवण येथेच धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात आलेले नाहीत.
तात्पुरता उपाय
तात्पुरता उपाय म्हणून समुद्रकिनाऱ्यावर मोठय़ा प्लास्टिकच्या गोणीत वाळू भरून भिंती उभ्या केल्या आहेत. त्यासाठी वाढवण ग्रामपंचायतीचे २० हजार आणि वाढवण ग्रामस्थांनी १० हजारांचा निधी दिला आहे. भिंतीमुळे किनाऱ्यावरील येणाऱ्या लाटांना प्रतिबंध होऊ शकेल. मात्र या तात्पुरत्या उपाययोजनांपेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.
दरवर्षी समुद्राच्या भरतीचे पाणी गावात शिरते. समुद्रकिनाऱ्याची धूप झाल्याने मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. आजुबाजूच्या गावांमध्ये धूप प्रतिबंधक बंधारे बांधले जात आहेत. मात्र वाढवण येथे प्रशासन धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यास टाळाटाळ करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
– रमेश महादू पाटील,ग्रामस्थ वाढवण