अलिबाग– राज्यातील समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने पुढाकार घेतला आहे. समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने होणार आहे. यासाठी कोकणातील सात जिल्ह्यांसाठी सात मशिन्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या आंतर्गत रायगड जिल्ह्यासाठी चार अत्याधुनिक मशिन दाखल झाले आहे.
समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखणे स्थानिक प्रशासनासाठी मोठे जिकरीचे काम ठरत होते. मानुष्यबळाचा वापर करून विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता राखणे अशक्य ठरत होते. प्रामुख्याने पावसाळ्यात समुद्रातील कचरा मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवर वाहून येत असतो, यात प्लास्टिक व इतर प्रकारच्या कचऱ्याचा समावेश असतो. सामाजिक संस्थांच्या मदतीने अधून मधून समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता मोहीम राबविली जात होती. मात्र यात सातत्य राखणे अवघड असल्याने किनारे अस्वच्छ राहण्याचे प्रमाण मोठे होते. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाने पहिल्यांदाच समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी अधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली आहे.
हेही वाचा – “आनंद दिघे यांच्या तोंडी काही वाक्ये घालून…”; संजय राऊतांची ‘धर्मवीर २’वर सडकून टीका
यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने कोकणातील सर्व जिल्ह्यांसाठी समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकी एक बॉब कॅट नामक मशिन दिले होते. दुसऱ्या टप्प्यात बीच टेक कंपनीची जर्मन बनावटीची मशिन्स एमपीसीबीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही मशिन्स ट्रक्टरच्या साह्याने समुद्रकिनारी वापरता येणार आहे. समुद्र किनाऱ्यावरील रेती चाळून त्यातील कचरा साफ करण्याचे काम या माध्यमातून केले जाऊ शकणार आहे.
रायगड जिल्ह्यासाठी ४ मशिन्स उपलब्ध झाली असून श्रीवर्धन, नागाव, किहीम आणि काशिद या चार समुद्र किनाऱ्यांवर ही मशिन्स दिली जाणार आहे. स्थानिक ग्रामपंचायती अथवा नगर पालिकांना या मशिन्सच्या व्यवस्थापनाचा खर्च करावा लागणार आहे. देखभाल दुरुस्ती कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
कोकण किनारपट्टीवरील सात जिल्ह्यासाठी सात बीच टेक कंपनी ट्रॅक्टर रविंद्र शेवाळे, ओंकार पाठक, पाम टेक कंपनीचा मॅनेजर श्रीवर्धन, नागाव, किहीम आणि काशिद या चार ठिकाणी देणार.
या मशिनच्या माध्यमातून समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता केली जाईल. कचरा उचलणे, त्याचे संकलन करणे, संकलित केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे, वाळूत साचलेल्या कचऱ्याचे संकलन करणे, वाळूचे सपाटीकरण करणे यासारखी कामेही केली जाऊ शकणार आहेत. यंत्राच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही कंपनीच्या माध्यमातून केला जाणार आहे.
हेही वाचा – रत्नागिरी: मुसळधार पावसाचे पाणी खेड, राजापुर, चिपळूण बाजार पेठेत शिरले
समुद्र किनाऱ्याची स्वच्छता सुलभ व्हावी यासाठी चार मशिन्स महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने उपलब्ध केली आहेत. ज्यामुळे किनारपट्टीची स्वच्छता सुलभपणे होऊ शकेल. श्रीवर्धन, नागाव, काशिद आणि किहीम या चार ठिकाणी दिली जाणार आहेत. – रविंद्र शेवाळे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विभाग
या मशिनच्या साह्याने एका तासात अडीच एकरच्या परिसराची स्वच्छता केली जाऊ शकते. ज्यातून एक ते दिड टन कचरा संकलन केले जाऊ शकते. कमीत कमी मनुष्यबळात हे काम केले जाऊ शकते. – ओंकार पाठक, व्यवस्थापक, पाम टेक कंपनी