नागरिक भयभीत; शाळेला संरक्षण भिंत बांधण्याची मागणी!
माहूर तालुक्यातील दिगडी धानोरा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत अस्वलाने मुक्त संचार करत ठिय्या मांडल्याने पालक आणि गावातील नागरिका मध्ये भीती चे वातावरण पसरले आहे. माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेले मौजे दिगडी धानोरा तांडा येथे वर्ग एक ते चार ची प्राथमिक शाळा असून विद्यार्थी संख्या १७ आहे.येथे दोन शिक्षक कार्यरत असून शाळेच्या बाजूला शेत आणि गावाला लागून जंगल असल्याने जंगली जनावरे नेहमीच गावामध्ये येऊन धुमाकूळ घालण्याचे प्रकार याआधी घडलेले आहेत.
आज दिनांक १६ रोजी सकाळी एक मोठा अस्वल शाळेच्या परिसरात येऊन शाळे भवती फेऱ्या मारीत असल्याचे नागरिकांनी पाहिले.आज रविवार सुट्टी चा दिवस असल्याने शाळेत सुदैवाने विद्यार्थी नव्हते. नागरिकांनी आरडा ओरड केल्याने अस्वलाने जंगलात धूम ठोकली त्यामुळे अनर्थ टळला. दिगडी धानोरा तांडा हा दुर्गम डोंगराळ आणि अवघड भागात वसलेला असल्याने या गावाला लागून चार ही बाजूंनी जंगल आहे. तसेच येथील जिल्हा परिषद शाळेला संरक्षक भिंत नसल्याने अनेक वेळा जंगली जनावरांनी येथे धुमाकूळ घातलेला असून वर्गामध्ये सरपटणारे साप आणि विंचू ही अनेक वेळा आढळले असून या शाळेला तात्काळ सरक्षित भिंत उभारावी व जिल्हा परिषद प्रशासनाने येथील शाळेला सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे