महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी कुलावती कांबळे या महिलेचा मृतदेह लोहारा पोलीस ठाण्यात तब्बल ६ तास ठेवून नातेवाइकांनी ठिय्या दिला. उमरगा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी एम. राकेश कलासागर यांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह तेथून हलविण्यात आला.
लोहारा तालुक्याच्या नागूर येथे दलित कुटुंबातील कुशेंद्र कांबळे व बाजार समितीचे माजी सभापती दिनकर जावळे-पाटील यांचा शेतजमिनीवरून मागील काही वर्षांपासून वाद आहे. २५ नोव्हेंबरला कांबळे व जावळे-पाटील या दोन्ही गटांत जमिनीवरून हाणामारी झाली. या वेळी किशोर कांबळे, बालाजी कांबळे, वत्सला गायकवाड किरकोळ जखमी झाले. कलावती कुशेंद्र कांबळे ही महिला गंभीर जखमी झाली. त्यांना उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना मुंबईस हलविले होते. परंतु मुंबई येथील रुग्णालयात सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
जावळे-पाटील यांच्या मारहाणीमुळेच कलावती कांबळे यांचा मृत्यू झाला, असा आरोप करीत थेट मुंबईवरून लोहारा पोलीस ठाण्यात मृतदेह आणण्यात आला. याची खबर लागताच रिपाइं जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, जि.प. सदस्य कैलास िशदे, हरिश डावरे, प्रा. डी. के. कांबळे, धीरज बेळंबकर, तानाजी कदम यांच्यासह जिल्ह्यातील दलित कार्यकत्रे पोलीस ठाण्यात जमले. आरोपी दिनकर जावळे-पाटील, विनोद दिनकर जावळे, तानाजी मोहन पाटील यांना अटक करण्याची मागणी लावून धरली. मंगळवारी सकाळी ९ वाजता मृतदेह ठाण्यात आणला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी कलासागर यांनी लोहारा पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला. अखेर दुपारी अडीच वाजता मृतदेह हलविण्यात येऊन नागूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा