शिरवळ (ता.खंडाळा) येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रात्री वसतिगृहात गोंधळ सुरु असल्याचा तक्रारीची शहनिशा करण्यासाठी गेलेल्या तीन पोलीस कर्मचारी आणि होमगार्डने मारहाण केली. याबाबतच्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तीन पोलिसांसह एका होमगार्डला निलंबित केले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली. या मारहाणीच्या घटनेचा विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकानी आज(शुक्रवार) महाविद्यालय बंद ठेवत निषेध नोंदवत दिवसभर आंदोलन केले.
शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांचा रात्री गोंधळ सुरु असतो अशी स्थानिकांची तक्रार होती. त्याची शहनिशा करण्यासाठी शिरवळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि होमागार्ड गेले होते. यावेळी विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरु होता. पोलिसांना बघून आणखी गोंधळ वाढल्याने तेथे लाठीचार्ज केल्याचे समजते. त्यामुळे काही विद्यार्थी जखमी झाले. रात्रीच्या वेळी कोणतीही समज न देता आम्हाला पोलिसांनी मारहाण केल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. त्याची काही छायाचित्रे समाज माध्यमातून आल्यानंतर त्यांनी केलेल्या प्रकरणाच्या चौकशीत तीन पोलीस कर्मचारी व होमगार्ड दोषी आढळल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी या महाविद्यालयातील डॉक्टर विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केले. या आंदोलनाची झळ राज्यातील शिरवळ, मुंबई, नागपूर, परभणी, उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयांना बसली. ही महाविद्यालये आज सर्व विद्यार्थ्यांकडून बंद ठेवण्यात आली. फलटणचे पोलीस उपाधीक्षक तानाजी बर्डे, तहसीलदार दशरथ काळे, शिरवळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, उपनिरीक्षक सतीश आंदेलवार सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास आहेर यांनी आज महाविद्यालयाला भेट दिली. त्यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची बाजू समजून घेतली. विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली. महाविद्यालय प्रशासन,वसतीगृह प्रमुख आदींना कोणतीही पूर्व कल्पना न देता पोलिसांनी सुरक्षा रक्षकासह विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे महाविद्यालय प्रशासनाने म्हटले आहे.
”प्राथमीक चौकशीत तीन पोलीस कर्मचारी व होमगार्ड दोषी आढळल्याने त्यांना निलंबित केले आहे. पुढील चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकानी पोलीस उपअधीक्षक (फलटण)तानाजी बरडे व (वाई) डॉ.शीतल जानवे खराडे यांना दिले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.” अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली आहे.