स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा पलूस पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा या कार्यकर्त्यांला शनिवारी झालेल्या पंचायत समितीच्या आमसभेत पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या समोरच बेदम मारहाणीचा प्रकार घडला. अत्यवस्थ स्थितीत त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर मोर्चाने गेलेल्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री डॉ. कदम यांच्या निवासस्थानावर दगडफेक केली. कार्यकर्त्यांला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दुपारनंतर पलूस, वसगडे, ब्रम्हनाळ, नांद्रे या ठिकाणी उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. बसवर दगडफेक झाल्यानंतर सांगली-पलूस बससेवा काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात आली होती.
पलूस पंचायत समितीची आमसभा पालकमंत्री डॉ. कदम यांच्या उपस्थितीत शनिवारी आयोजित करण्यात आली होती. पंचायत समितीचे सदस्य या नात्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांनी ऊस दराबाबत प्रश्न उपस्थित करीत कारखानदार आधारभूत दरानुसार उसाचे पसे दिले जात नाहीत. याबाबत भूमिका काय? अशी विचारणा करू लागताच डॉ. कदम समर्थक कार्यकर्त्यांनी राजोबा यांना व्यासपीठावरून खाली ढकलत बेदम मारहाण केली. यामध्ये राजोबा यांना गंभीर दुखापत झाली असून छातीच्या तीन बरगडय़ा तुटल्या आहेत. मारहाणीनंतर बेशुद्ध झालेल्या राजोबा यांना तत्काळ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या मारहाणीच्या प्रकारामागे काँग्रेसचेच कार्यकत्रे वाळू माफिया असल्याचा आरोप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. एक जिल्हा परिषद सदस्यही मारहाणीत सहभागी राहून इतरांना प्रोत्साहीत करीत असल्याचा आरोपसुद्धा करण्यात आला.
राजोबा यांना इस्पितळात दाखल करण्यात आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संघटनेचे कार्यकत्रे सदाभाऊ खोत, महेश खराडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, निता केळकर आदींसह शंभरभर कार्यकत्रे डॉ. कदम यांच्या अस्मिता या निवासस्थानी निवेदन देण्यासाठी गेले. पालकमंत्री घरी नसल्याचे समजताच घोषणाबाजी करीत ठिय्या मारून राहिले.
बंगल्यासमोर होणारी घोषणाबाली लक्षात येताच डॉ. कदम यांचे चिरंजीव तथा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम बाहेर आले. त्यांनी चच्रेसाठी सदाभाऊ खोत, महेश खराडे, निता केळकर यांना आतमध्ये येण्यासाठी विनंती केली. मात्र कार्यकत्रे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. याचवेळी अज्ञात कार्यकर्त्यांनी बंगल्यावर जोरदार दगडफेक केली. दगडफेकीत बंगल्याच्या दर्शनी भागातील काचा फुटल्या. या दरम्यान पोलीस अधीक्षक दिलीप सावंत फौजफाटय़ासह घटनास्थळी आले. त्यांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस मुख्यालयाकडे नेले. निवासस्थानासमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असून मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला आहे.
आंदोलक कार्यकत्रे व विश्वजित कदम यांच्यात चर्चा सुरू असताना दोन्ही बाजूने पोलीस अधीक्षक यांच्यासमोरच घोषणाबाजी व शिवीगाळ झाली असल्याचे सांगण्यात येते. स्वत  कदम यांनीही कार्यकर्त्यांना उद्देशून अपशब्द वापरल्याचा आरोप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. आंदोलकांना दडपशाहीच्या मार्गाने गप्प बसविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला.
दरम्यान भाजपाचे खा. संजयकाका पाटील यांनी रुग्णालयात जाऊन संदीप राजोबा यांच्या प्रकृतीची चौकशी केली. शासकीय रुग्णालयातील तपासणीनंतर त्यांना मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
राजकीय स्टंटबाजी – कदम
संदीप राजोबा यांना झालेला मारहाणीचा प्रकार म्हणजे राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप करीत पोलिसांनी सत्य उघडकीस आणावे असे आवाहन पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना केले. ऊस दराचा प्रश्न सोडविण्यासाठी कायदा आहे. मात्र राजकीय स्टंटबाजी करून अशांतता निर्माण करणे निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader