पदाचा राजीनामा देण्यासाठी तालुक्यातील कापरेवाडीच्या महिला सरपंच मंदाबाई राजेद्र वांगडे व त्यांचे पती राजेद्र बाबा वांगडे यांना ग्रामपंचायतीतच बेदम मारहाण करण्यात आली. सरपंच पदाचा राजीनामा दिला नाहीतर हात पाय तोडण्याची धमकीही त्यांना देण्यात आली आहे. काल, शनिवारी सकाळी ही घटना घडली.
जखमी सरपंच वावडे व त्यांच्या पतीस उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे. त्यांना काठी व दगडाने मारहाण करण्यात आली. एकूण सात जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यात ग्रामपंचायतीच्या एका महिला सदस्याचाही समावेश आहे. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व उपसरपंच गटात गेल्या काही दिवसांपासुन गटबाजीतून सतत कुरबुरी सुरु आहेत.
पोलिसांकडे श्रीमती वांगडे यांनी फिर्याद दिली आहे. आपण ग्रामपंचायतीमध्ये असताना तिथे आप्पा हरिभाऊ गायकवाड, अशोक एकनाथ गायकवाड, दत्तात्रय हरिभाऊ गायकवाड, बापु यशंवत कापरे, सागर आप्पा गायकवाड, बापु यशवंत कापरे, व ग्रामपंचायत सदस्या रंजना आप्पा गायकवाड हे आले व त्यांनी तुला वारंवार सांगितले तरी सरंपच पदाचा राजीनामा देत का नाही , आम्हाला तुला पदावर राहू दयावयाचे नाही, जर तु सरंपच पदाचा राजीनामा दिला नाही तर आम्ही तुझे हात पाय तोडू असे म्हणत काठी व दगडाने मारहाण करण्यास सुरवात केली, पती राजेंद्र तेथे आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या संतोष गायकावाड यांनाही मारहाण केली.
यापुर्वीही गावातील विकास कामे करताना हे सर्व लोक जाणीवपूर्वक अडथळा आणून त्रास देत असतात, असेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलीसांनी अद्यापि आरोपींना अटक केलेली नाही.

Story img Loader