सोलापूर : एकमेकांत गुंतलेल्या धाग्यांनिशी बनलेल्या विशिष्ट आणि सुबक नक्षीकाम असलेल्या सोलापुरी चादरी म्हणजे महाराष्ट्रातील ‘भौगोलिक मानांकन’ (जीआय) मिळालेले पहिले उत्पादन. ६०च्या दशकापासून सोलापुरातून देशभर पोहोचत असलेल्या या चादरींना २००५ मध्ये मानांकन मिळाले, पण या व्यवसायाला ओहोटी लागली. देशाच्या अन्य भागांतून या चादरींची हुबेहूब पण दर्जा नसलेली नक्कल करून बनवलेल्या चादरी ‘सोलापुरी’ म्हणून बाजारात खपू लागल्या तसा मूळच्या सोलापुरी चादरींचा रंगच उडाला. एके काळी सोलापूरच्या वस्त्रोद्योगाचे ‘भारवाही’ असलेले हे उत्पादन आता जेमतेम दहा टक्क्यांवर घसरले आहे.

हरियाणातील पानिपत, पंजाबमधील लुधियानासह तमिळनाडूतील इरोड, करूर, चेन्नमलाई, मदुराईतून यंत्रमागावर तयार होणाऱ्या चादरी सोलापुरी चादरी म्हणून स्वस्त दरात विकल्या जात आहेत. दिसायला हुबेहूब, सुंदर नक्षीकाम आणि आकर्षक रंगसंगतीच्या या बनावट सोलापुरी चादरी वजनाने तेवढ्याच हलक्या, कमी टिकाऊ आणि स्वस्त दरात सहज उपलब्ध होतात. याच बनावट चादरींनी सोलापूरची संपूर्ण बाजारपेठ काबीज केली आहे. ही नक्कल थांबविण्यासाठी यापूर्वी स्थानिक उद्योजकांनी केंद्रीय वस्त्रोद्योग समितीकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्या प्रयत्नांतून सोलापुरी चादरीला जीआय-८ आणि टॉवेल उत्पादनाला जीआय-९ (जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्रेशन) मानांकन मिळविले होते. परंतु त्याचा काहीच फरक पडलेला नाही.

हेही वाचा >>> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?

६०च्या दशकात किसनराव क्षीरसागर यांनी सोलापुरी चादरीची सर्वप्रथम निर्मिती केली. तेव्हापासून या चादर उद्योगाने सोलापुरचे अर्थकारण बदलून टाकले. मात्र, या व्यवसायातील काळानुरूप बदल न स्वीकारले गेल्याने चादर निर्मितीस मर्यादा येऊ लागल्या. आधुनिक यंत्रमागांच्या साह्याने उत्पादन आणि दर्जावाढीकडे भर दिलाच गेला नाही. देशात अनेक वस्त्रोद्योग नगरांमध्ये केंद्र व राज्य सरकारांच्या मदतीने ‘टेक्स्टाइल पार्क’ उभे राहिले, मात्र सोलापुरात गरज असतानाही याबाबत पावले उचलली गेली नाहीत.

१४ हजार पारंपरिक यंत्रमाग

सोलापुरात सध्या पारंपारिक यंत्रमागांची संख्या १४ हजारांवर राहिली आहे. काही नवउद्योजकांनी सोलापुरी चादरीच्या उत्पादनातील पारंपरिक बाज कायम ठेवून, रॅपियर्ससारख्या आधुनिक यंत्रमागावर उत्पादन सुरू केले आहे. पारंपरिक यंत्रमागावर दिवसा १० चादरी तयार होतात, तर रॅपियर्सवर १२ तासांत ३० चादरींचे उत्पादन होते. रॅपियर्स यंत्रमागांची संख्या सध्या ३० ते ४० इतकीच आहे. त्यांची संख्या वाढल्यास उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. सध्या सोलापूरच्या वस्त्रोद्योगाची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ९०० कोटींच्या घरात असून त्यापैकी सोलापूर चादरींची उलाढाल १०० कोटींच्या खाली आली आहे. टॉवेल, टेरी टॉवेलवर येथील वस्त्रोद्योग तग धरून आहे.

राजकारण आणि आश्वासने

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरच्या प्रचार सभेत काँग्रेसचे नेते, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडताना नरेंद्र मोदी यांनी चादरींचा विषय काढला होता. ‘सोलापुरात उत्पादित होणाऱ्या सोलापुरी चादरी आणि अन्य वस्त्रे पोलिसांसाठी जरी पुरविली गेली असती तर सोलापूरचा वस्त्रोद्योग निश्चित वाढला असता’ असे ते म्हणाले होते. मात्र नंतर केंद्र आणि राज्यात सत्तेत आलेल्या भाजपकडूनही हा विषय हाती घेण्यात आला नाही. योगगुरू रामदेव यांनीही पतंजली केंद्रांच्या माध्यमातून सोलापुरी चादरी आणि टॉवेल्स उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते. पण त्याचे पुढे काहीच घडले नाही.

३० टक्के कामगारांचे स्थलांतर

२० वर्षांपूर्वी सोलापूरच्या यंत्रमागावर उत्पादित सोलापुरी चादरींची भरभराट होती. पूर्वी ३० हजार यंत्रमाग होते. त्यावर चादरींचे अधिक उत्पादन व्हायचे. परंतु आता सारे काही विस्कटले गेले आहे. पुन्हा नव्याने उभारी घेणे शक्य नसल्याने वैफल्य आलेले ३० टक्के उद्योजक आणि कामगार तेलंगणात स्थलांतरित झाले आहेत. राजकीय इच्छाशक्ती खरोखर प्रबळ असेल तर सोलापूरच्या चादरींना जरूर ‘अच्छे दिन’ येतील, असे सोलापुरी चादरी उद्योगाचे अभ्यासक, समाजशास्त्राचे विश्लेषक प्रा. विलास बेत यांनी सांगितले.

उलाढालीत घट

सोलापुरी चादरीसारख्याच हुबेहूब बनावट चादरी पानिपत व अन्य भागांतून विक्रीसाठी येत असल्यामुळे अस्सल सोलापुरी चादरींचे अक्षरशः पानिपत झाले आहे. २० वर्षांपूर्वी सोलापुरात आठ हजार यंत्रमागांवर अस्सल सोलापुरी चादर तयार व्हायची. दररोज अडीच कोटींप्रमाणे वार्षिक सातशे कोटींची उलाढाल चादर उत्पादनातून होत असे. सध्या जेमतेम १२०० यंत्रमागांवर चादर तयार होते. त्यातून दररोजची उलाढाल केवळ ४० लाख रुपयांप्रमाणे वार्षिक उलाढाल शंभर ते सव्वाशे कोटींपर्यंत खालावली आहे. पूर्वी चादर निर्मितीसाठी ३० हजार कामगारांना रोजगार मिळायचा. आज केवळ पाच हजार कामगार शिल्लक आहेत, असे सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांचे म्हणणे आहे.

Story img Loader