सातारा: जावली तालुक्यातील कोलेवाडी या गावात अंत्यसंस्कारावेळी मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात माजी सभापतींसह २४ महिला व पुरुष जखमी झाले. जखमींना तालुक्यातील सोमर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोलेवाडी येथील शंकर नाना नवसरे यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले होते. आज सकाळी दहा वाजता त्यांच्यावर कुडाळी नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात येत होते. अंत्यसंस्कार सुरू असताना स्मशानभूमी शेजारील एका झाडावरील आग्या मोहोळाच्या मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला केला. त्यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला.

माजी सभापतींसह २४ जण जखमी

अचानक झालेल्या या हल्ल्याने उपस्थित असलेले लोक मधमाशांपासून बचावासाठी सैरावैरा पळत सुटले. अनेकांनी कुडाळी नदीपात्रात उड्या घेतल्या. तर काहीजण उंच गवतात लपून बसले. सुमारे अर्धा तास हा गोंधळ कुडाळी नदीकाठी चालू होता. या हल्ल्यात माजी सभापती जावळीचे माजी सभापती मोहनराव शिंदे, संजय बामणे (दोघेही रा. हुमगाव) यांच्यासह २४ महिला व पुरुष जखमी झाले.

जखमींना सोमर्डी (ता. जावली) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. या सर्वांवर उपचार सुरू असून त्यांची सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन यादव यांनी दिली आहे.