कराड : कुस्त्यांसाठी सज्ज पैलवान आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी शेकडो शौकिन जमलेले असताना अचानक मधमाशांनी हल्ला चढवल्याने घडलेल्या घटनेत काही पहिलवानांसह १५ जण जखमी झाले आहेत. पाटण तालुक्यातील सणबूर गावी ही घटना घडली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. यामध्ये काहीजण गर्दीत चेंगराचेंगरीमध्ये पडून किरकोळ जखमीही झाले.
सणबूर (ता. पाटण) येथील ग्रामदैवत श्री विठ्ठलाई देवीच्या यात्रेनिमित्त एका शेतात कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले होते. या साठी राज्यभरातून अनेक पैलवान आले होते. या कुस्त्या पाहण्यासाठी परिसरातील कुस्ती शौकीनही शेकडोंच्या संख्येने जमा झालेले होते. हा खेळ रंगात आलेला असतानाच अचानकपणे कुठेतरी आग्या माशांचे पोळे उठले आणि या हजारो मधमाश्यांनी या मैदानावर उपस्थित नागरिक, पैलवानांवर हल्ला चढवला. हल्ल्याने एकच गोंधळ उडाला, सर्वत्र धावपळ सुरू झाली. यामध्ये मधमाशांच्या हल्ल्यात काही पहिलवानांसह १५ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये यात्रेला आलेल्या महिला, लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व जखमींना प्राथमिक उपचार करत तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये पडून काहीजण किरकोळ जखमीही झाले असल्याचे समजते.