Beed Crime News Viral Video : बीडमधील वाढती गुन्हेगारी व त्या गुन्हेगारांना मिळणारा राजाश्रय ही राज्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे तिथले रहिवासी दहशतीत आहेत. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले. आता असंच एक मारहाणीचं प्रकरण बीडमधून समोर आलं आहे. बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. कुख्यात गुंड व भाजपा पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याने त्याच्या काही साथीरांसह ही मारहाण केली आहे. भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्यामुळे धस यांच्यावरही टीका होत आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेचा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत राज्याच्या गृहखातं व आमदार धस यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दमानिया यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे, “गृहमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस व आमदार सुरेश धस यांनी उत्तर द्यावे की हे काय आहे? हा मारणारा माणूस सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का? बीडच्या शिरूर तालुक्यातील गुंडगिरीचा हा व्हिडीओ पाहा. बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा हा व्हिडीओ पाहा. याप्रकरणी अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.”

अंजली दमानिया यांची पोस्ट

सुरेश धस यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच मारहाण करणारा सतीश भोसले हा त्यांचा कार्यकर्ता असल्याचं धस यांनी मान्य केलं आहे. ते याबाबत म्हणाले, “होय! सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता आहे. त्याचा मारहाणीचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो व्हिडीओ मी पाहिला आहे. त्यानंतर मी संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांना फोन केला आणि त्यांना विचारलं की हा काय प्रकार आहे? त्यानंतर मला माहिती मिळाली की ही एका साखर कारखान्याच्या परिसरात घडलेली घटना आहे. ऊसतोड मजुराच्या घरातील महिला अथवा मुलीच्या छेडछाड प्रकरणानंतर ती घटना घडली होती. ती दिड वर्षांपूर्वीची घटना आहे. मात्र या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यानंतर मी पोलिसांना स्पष्ट सांगितलं की मारहाण करणारा माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्याविरोधात तक्रार आली तर ती तक्रार घ्या आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा.

Story img Loader