भाजपाचे नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य रमेश कराड यांनी गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी दिंवगत मुंडे यांचे सहकारी दिनकर मुंडे गुरूजी यांच्यासह जेष्ठ कार्यकर्त्यांनी हजेरी लावून त्यांचे स्वागत केले. मात्र, करोना संचारबंदीतील नियमांचे पालन केले नाही व गर्दी जमवली यामुळे गुरूवारी रात्री परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांना टाळून पक्षाने कराडांना संधी दिल्याने त्यांच्या स्वागतासाठी कोण कोण? येणार याकडे लक्ष्य लागले होते.

बीड जिल्ह्यातील भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना अपेक्षा असताना, पक्षाने ऐनवेळी लातूरचे रमेश कराड यांना विधानपरिषदेची संधी दिली. पक्षांतर्गत राजकारणात पंकजा मुंडे यांना टाळल्याने समर्थकांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर समाजमाध्यमातून टीकेची झोड उठवली आहे. या पार्शभूमीवर आमदारकीची शपथ घेतल्यानंतर गुरुवार (२१ मे) रोजी नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांनी परळी जवळील गोपीनाथ गडावर येऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

यावेळी दिवंगत मुंडे यांचे विश्वासू सहकारी दिनकर मुंडे गुरूजी, श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे, डॉ. शालिनी कराड यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी करोना संचारबंदी नियम मोडल्याप्रकरणी रात्री ग्रामीण पोलीस ठाण्यात आमदार कराड, डॉ. शालिनी कराड यांच्यासह २२ लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader