राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या दबावापुढे झुकत अखेर राज्य सरकारने बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची बदली केली. केंद्रेकर यांच्या जागी नवलकिशोर राम यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी गुरुवारीच पदभार स्वीकारला. केंद्रेकर यांची औरंगाबादला सिडकोचे मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बीडमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते केंद्रेकर यांच्या बदलीसाठी आग्रही होते. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ३-४ वेळा भेटही घेतली होती. केंद्रेकर यांच्या बदलीसाठी ही भेट घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटींच्या पार्श्वभूमीवरच केंद्रेकर यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. दरम्यान, केंद्रेकर यांच्या बदलीमुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. बीडमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले.
जिल्ह्यातील प्रशासनात पारदर्शकता आणण्यात केंद्रेकर यशस्वी ठरले होते. त्यांनी दुष्काळाच्या नावाखाली सुरू असलेले अनावश्यक टॅंकर बंद केले होते. त्याचबरोबर काही ठिकाणी चारा छावण्यांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. यापूर्वीही केंद्रेकर यांची बदली करण्यात आली होती. मात्र, स्थानिकांनी त्याला तीव्र विरोध केल्यानंतर बदली मागे घेण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा