बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथील पौर्णिमा कॉटन जिनिंग अॅण्ड प्रेसिंग फॅक्टरी प्रा. लि. मधून ४७ लाख ७८ हजार ४०० रुपयांची रोकड पळवण्यात आली. ही घटना २५ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली असून याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संदर्भात माजलगाव येथील व्यावसायिक ओंकार उत्तमराव खुर्पे (वय ४०, रा. नवीन बस स्टॅण्डसमोर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार खुर्पे यांची वरील नावाची कॉटन जिनिंग कौडगाव घोडा येथे आहे. मागील १५ वर्षांपासून शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून त्यातील सरकी बाजूला काढून रुईच्या गाठी तयार केल्या जातात. या ठिकाणी सहा खोल्यांचे बांधकाम आहे. त्यात निवासी व कार्यालयीन कामाची यंत्रणेची व्यवस्था आहे. २५ डिसेंबर रोजी नाताळ व रविवारी साप्ताहिक, अशा सलग दोन सुट्टया असल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस खरेदी केलेले पैसे वाटप करण्यासाठी जिनिंगच्या नावे परळीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ५० लाख काढले होते. फिर्यादी बाहेर गावी असल्याने कॅशिअर अशोक भीमराव साळुंके व निलेश विलासराव देशमुख यांना २४ डिसेंबर रोजी बँकेतून वरील काढून आणण्यासाठी पाठवले होते.

रक्कम काढून आणल्यानंतर त्याच दिवशी काही रक्कम वाटप केली. उर्वरीत रक्कम मोजली असता ती ४७ लाख ७८ हजार ४०० रुपये एवढी शिल्लक होती. यापैकी ४५ लाख रक्कम जिनिंगमधील लोखंडी कपाटातील तिजोरीत ठेवली होती. तर २ लाख ७८ हजार ४०० समोरच्याच एका खोलीतील लोखंडी कपाटात कुलूप लावून ठेवली. त्याच दिवसी मध्यरात्री कॅशिअर साळुंके व जिनिंगवरील ग्रिडर कारभारी कचरू हरकाळ हे दोघे मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास झोपले. पहाटे सव्वा तीनच्या सुमारास कारभारी यांनी फोनद्वारे कळवलेल्या माहितीनुसार कॅशिअर साळुंके यांनी त्यांना दार ठोठावून उठवले. चोरट्यांनी साळुंके यांच्या उशी खाली ठेवलेल्या चाव्या घेऊन एका कपाटातील २ लाख ७८ हजार ४०० सह चेकबुक तर दुसऱ्या कपाटातील ४५ लाख रुपयांची रोकड पळवली.

घटना कळल्यानंतर पुतण्या राहुल व सिद्धांत यांना जिनिंगवर पाठवले. पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी फिर्यादीही पोहोचले असता लोखंडी कपाटाला चाव्या नसल्यामुळे ड्रील व कटरच्या सहाय्याने उघडण्यात आले तेव्हा वरील रक्कम पळवण्यात आल्याचे लक्षात आले, असे ओंकार खुर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.