बीडमधील राजकीय वातावरण मुंडे भाऊ बहिणींच्या आरोप प्रत्यारोपांमुळे पुन्हा एकदा चांगलच तापल्याचं चित्र दिसत आहे. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी माफीयाराजचा उल्लेख करत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेवर टीका केल्यानंतर आता धनंजय मुंडेंनी या टीकेला कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलंय. माझ्यावर टीका करताना थेट नाव घेऊन बोला त्यात बीड जिल्ह्याचं नाव कशाला खराब करताय असं थेट आव्हानच धनंजय मुडेंनी आपल्या बहिणीला दिलंय.

पंकजा काय म्हणाल्या?
बीड जिल्ह्यातील केज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्यामध्ये मोठा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत सत्ताधारी आमदरांवर म्हणजेच धनंजय मुडेंवर निशाणा साधला. बीड जिल्ह्यात माफियाराज सुरू झाला आहे, सामान्य लोकांचे हित धाब्यावर बसून स्वतःचे खिसे भरण्याच काम सुरु आहे. असं म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. आम्ही दोन वर्ष शांत बसलो होतो. राजकारण नको म्हणून कुणावर टीका टिप्पणी केली नाही. मात्र आज बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या माफियाराज आणि सामान्य लोकांची लूट पाहावत नाही. म्हणून रस्त्यावर उतरून न्याय मागणार असल्याची भूमिका पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली.

धनंजय मुडेंचं उत्तर…
याच टीकेला उत्तर देताना आता धनंजय मुडेंनी पंकजा यांना सुनावलं आहे. “आपण ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचा आपल्याला मान असला पाहिजे, अभिमान असला पाहिजे. कुठंतरी विरोधाला विरोध करायचा. कुठला मुद्दा मिळत नसला की बीडच्या माफियाराजवर बोलायचं. तुम्ही बीडच्या माफियाराजवर बोलत असाल तर नाव घेऊन बोला ना. त्याच्यात बीडचं नाव कशाला तुम्ही खराब करताय?,” असा प्रश्न धनंजय मुडेंनी पंकजा मुंडेंना विचारलाय.

नक्की वाचा >> मुंडे विरुद्ध मुंडे: बाबासाहेबांचा अपमान केल्याच्या मुद्यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; धनंजय मुंडे म्हणाले, “बोलताना भान…”

“चांगलं काम सुरु असताना बघवलं कसं?”
“त्यांच्याकडे कुठलेही आरोप करण्यासाठी नाहीयत, एवढं चांगलं काम या बीड जिल्ह्यामध्ये सुरु आहे. एवढं चांगलं काम सुरु असताना बघवलं कसं?, असा टोला धनंजय मुडेंनी लगावलाय. “कुठला तरी विषय काढायचा आणि आधी माफीया लावून द्यायचं. त्यानंतर तुम्ही लगेच ब्रेकिंग करायचं,” असा चिमटा धनंजय मुडेंनी काढला.