बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याचबरोबर त्यांच्या वाहनचालकास एक दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली गेली आहे.
करूणा शर्मा काल परळीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने, एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आज त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात आलं होतं दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर, न्यायलयाने वरील निर्णय दिला.
तर, न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी जामिनासाठी याचिका देखील दाखल केली आहे. सध्या त्यावर सुनावणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आपण तपास कार्यात सहकार्य करण्यास तयार असून, आपल्याला जामीन मंजूर करावा, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.
परळीमध्ये करुणा शर्मांच्या वाहनात आढळले पिस्तूल!
सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा काल रविवारी परळीत दाखल झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या वाहनामध्ये पिस्तूल आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तर, समाज माध्यमातून धनंजय मुंडेंच्या विरोधातील सर्व पुरावे जाहीर करण्याचा इशारा देऊन करुणा या परळीत दाखल झाल्या होत्या.