पिंपरी-चिंचवड : बीड जिल्हा हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो तेथील दुष्काळ. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा व्हायचा. एवढंच नाही तर या दुष्काळामुळे गावच्या गावं शहराकडे स्थलांतरित झाली आहेत. मात्र वॉटर कप स्पर्धेने पुन्हा अनेक गावांना गतवैभव मिळवून दिलंय. या उपक्रमामुळे गावच्या गावं टँकरमुक्त झाली आहेत. धारूर तालुक्यातील कोळपिंपरी गावही आधुनिक युगाकडे वाटचाल करणारे ठरत असून हवेपासून पाणी तयार करणारा प्रकल्प याठिकाणी बसविण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प अमेरिकेतील झिरो मास वॉटर सोर्स ही संस्था राबवत आहे. या प्रकल्पाची (यंत्राची) किंमत आहे तब्बल ३० लाख रुपये. त्यामुळे एकेकाळी दुष्काळग्रस्त असणाऱ्या कोळपिंपरी गावात चक्क आता अमेरिकेतील संस्था प्रकल्प राबवत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक अशोक हतागळे आणि ग्रामसेवक अमोल राऊत हे तरुण शासकीय अधिकारी गेल्या दोन वर्षापासून गावात ठिय्या मांडून आहेत. यांनी गावात योजना आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र शासनाकडून ३५० गावांपैकी मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत कोळपिंपरी गावाची प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. अमेरिकेमधून सॅटेलाईटद्वारे या गावच्या परिसराची पाहणी करण्यात आली आणि शेवटी कोळपिंपरीची निवड निश्चित करण्यात आली. हे यंत्र बसवण्यासाठी अमेरिकेमधून इंजिनिअर बेंझामीन आले होते, गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या छतावर सौर ऊर्जा आणि हायड्रो पॅनलच्या सहा प्लेट बसवण्यात आल्या असून या सहा प्लेटमध्ये हवेपासून तयार झालेलं पाणी साठतं. प्रत्येक प्लेटमध्ये पाच लिटर पाणी जमा होते. हेच शुद्ध पाणी नलिकेद्वारे थेट छोट्या फिल्टरमध्ये जाते. सध्या हे पाणी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थाना मिळत आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाला वीज लागणार नाही. हा देशातील पहिला प्रकल्प असल्याची माहिती मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक अशोक हतागळे यांनी दिली आहे. या प्रकल्पामुळे गावात नवचैतन्य निर्माण झालं आहे. या प्लेटमध्ये बसविण्यात आलेल्या एका चिपद्वारे अमेरिकेतून हे यंत्र हाताळण्यात येणार आहे. यंत्रात बिघाड झाला किंवा ते चोरीला गेलं तर त्याकडे अमेरिकेतून लक्ष ठेवलं जाणार आहेत.

या प्रकल्पामुळे दुष्काळग्रस्त म्हणून ओळखलं जाणार कोळपिंपरी गाव आता अमेरिकेपर्यंत पोहचले आहे. दोन वर्षांपूर्वी कोळपिंपरी गावात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागत होतं. परंतु वॉटर कप स्पर्धेमधून एक लोकचळवळ उभी झाली आहे. येथील ग्रामस्थांनी रात्रीचा दिवस केला आणि वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला. पुण्याच्या बालेवाडीत पार पडलेल्या कार्यक्रमात सिनेअभिनेते सचिन पिळगावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोळपिंपरी गावकऱ्यांना पारितोषिक मिळाले. आपण गाळलेल्या घामाची किंमत झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्याचं खरं बक्षिस त्यांना यावर्षीच्या उन्हाळ्यात मिळालं, ते म्हणजे त्यांच्या विहिरी गच्च भरून वहात आहेत. जिल्ह्यातील इतरे गावे या आदर्श गावाला भेट देत हा प्रकल्प पाहत आहेत. अशाचप्रकारे आपलं गावही दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार तेथील नागरिक करत आहेत.

गावाचे नाव अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करणार

“ज्या गावात डिसेंबर महिन्यापासूनच टँकर लागायचे त्या गावात आज गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे व शासनाच्या मदतीने हवेतून पाणी करण्याचा देशातील पहिला “प्रकल्प”गावात उभा राहिला आहे. गावाच कायापालट केवळ लोकचळवळ आणि नागरिकांच्या मेहनतीमुळे शक्य झालं. गावाच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर राहू आणि गावाचे नाव देशाच्या नकाशावर कसे येईल यासाठी प्रयत्न करू.

उषा विजयकुमार खुळे (सरपंच)

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beed kol pimpri drought problem new technique water cup competition winner water will be created from wind