बीडमध्ये पुन्हा एकदा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना धक्का बसला आहे. जिल्ह्यातील पाच नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाने वर्चस्व राखलं. वडवणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर केजमध्ये आघाडी आणि आष्टी, पाटोदा शिरूरमध्ये भाजपने बाजी मारली आहे. प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या वडवणी नगरपंचायतीत भाजपाचे सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.
पाच नगर पंचायतीसाठी मागील महिन्यात निवडणूक पार पडली. यामध्ये तीन नगरपंचायतींमध्ये भाजपने तर केजमध्ये जनविकास आघाडी आणि वडवणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. त्यानंतर सोमवारी नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. यावेळी आष्टी नगरपंचायत नगराध्यक्षपदी पल्लवी धोंडे यांची बिनविरोध तर उपनगराध्यक्षपदी शैलेश सहस्त्रबुद्धे यांची बिनविरोध निवड झाली.
‘आपका क्या होगा जनाबे आली’ गाण्यावर धनंजय मुंडेंचा डान्स; कौटुंबिक विवाह सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल
पाटोदा नगरपंचायत नगराध्यक्षपदी सय्यद खतीजाबी सय्यद अमर यांची तर उपनगराध्यक्ष शरद बांदळे यांची निवड झाली. केजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवून काँग्रेसने स्थानिक जनविकास आघाडी बरोबर हात मिळवणी केल्यानं येथे काँग्रेसने सत्ता मिळवली.
पंकजा मुंडे नगरपंचायत निवडणूक निकालानंतर काय म्हणाल्या होत्या?
पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना बीडमधील लढत मुंडे विरुद्ध मुंडे अशी नव्हती असं म्हटलं होतं. “सत्ता असूनही यश मिळवण्यात सत्ताधारी कमी पडले. लोकांनी भाजपाला पहिली पसंती दिली आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं होतं.
“ही लढत मुंडे विरुद्ध मुंडे अशी नव्हीत. एका मतदारसंघाचं नेतृत्व आणि जिल्ह्याचं पालकत्व यात फरक आहे. लोकांचा गेल्या अडीच वर्षातील कामकाजाचा राग आणि आमच्या काळातील कामकाजाची पावती असा तो निकाल आहे. बीडमधील लोकांनी भविष्यात काय चित्र असेल हे दाखवलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं होतं.
“बीड जिल्ह्यात एकसंघ असा भाजपा सोडून कोणताही पक्ष नाही. जे नेते आहेत हे एका भागापुरते आहेत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असा विचार करणारा एकही नेता नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी केली. सत्तास्थापनेचा जनादेश दिला आहे,जो विजय मिळाला आहे तो कार्यकर्ते यांचा विजय आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं होतं.