राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. बजरंग सोनवणे यांची विजयी रॅली काढण्यात आली होती. यावेळी जनतेला संबोधित करताना बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. “बीड जिल्ह्यातील जनतेनं मला खासदार करून माझी पात्रता दाखवून दिली आहे. मतदानाच्यावेळी हाणा, मारा, तोडा पण ताईंना मतं पडले पाहिजे, असे भाऊसाहेबांचे आदेश होते. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत”, असा गंभीर आरोप बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
बजरंग सोनवणे काय म्हणाले?
“आम्ही गेली ३२ वर्ष राजकारणात काम करत आहोत. मात्र, कधीही मस्ती येऊ दिली नाही. ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं त्यांच्या सुख आणि दुःखात मी असतो. जनतेनं मला आशीर्वाद दिले आहेत. आज बीडच्या जनतेला वाटतं की, बजरंग सोनवणे खासदार म्हणजे मीच खासदार आहे. जनतेची हीच भावना शेवटपर्यंत टीकवण्यासाठी मी काम करत राहणार आहे. मी खासदार म्हणून निवडून आलो तेव्हा पहिला फोन शरद पवारांना केला होता”, असं बजरंग सोनवणे म्हणाले.
हेही वाचा : “तुम्ही आमचे शत्रू नाही, पण…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले, “समाजाला कळून चुकलंय…”
बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
“मतदानाच्या दिवशी असे आदेश होते की, हाणा, मारा, तोडा पण ताईंना मतं पाडा असे भाऊसाहेबांचे आदेश होते. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत, मी जबाबदारीने बोलतो. पण बीडची जनता बोलली की काय करायचं ते करा. मात्र, आम्ही बजरंग सोनवणे यांनाच मतदान करणार. मला खासदार करण्यासाठी लोकांचा मोठा वाटा आहे. आता कोणी म्हणतं की या समाजाने मतदान केलं नाही, त्या समाजाने मतदान केलं नाही. पण मी सर्वांचे आभार मानतो”, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं.
“आता आमच्या शिरसाळ्याच्या कार्यक्रमाला ज्यांनी जागा दिली ते कॉलेज बंद करा असं काहीजण म्हणाले. पण तुम्हाला आणखीही मी एक विनंती करतो. तुम्ही हे धंदे बंद करा, नाहीतर बजरंग सोनवणे काय आहे? हे तुम्हाला एकदिवस दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी ठरवलं होतं की, शांत डोक्याने घ्यायचं. मात्र, तुम्ही माझी पात्रता काढता. काहीजण म्हणाले माझी मुलगी निवडून आणता आली नाही. मात्र, मीही याच शब्दावर निवडणूक कडेला आणली. बीड जिल्ह्यातील जनतेनं मला खासदार करून कोणाची काय पात्रता आहे हे दाखवून दिलं, तुम्ही बोगस मतदान केलं, दादागिरी केली. तुम्ही काही मतदान केंद्र ताब्यात घेतले, लोकांवर दबाव टाकला. तरीही मला बीडमध्ये लीड मिळालं”, असा हल्लाबोल बजरंग सोनवणे यांनी केला.