Bajrang Sonawane On Amol Mitkari : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेला २५ दिवसांनंतर काही आरोपी अटक करण्यात आले, तर काही आरोपी अद्यापही फरार आहेत. तसेच पवनचक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आला असून त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, वाल्मिक कराड याचा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग आहे का? याबाबत विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरूनच राजकारण चांगलंच तापलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा आणि वाल्मिक कराड याचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. तसेच अमोल मिटकरी यांनी खोचक टीकाही केली. मात्र, यावरून खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं आहे. ‘अमोल मिटकरींना हे खूप महागात पडेल’, असा इशारा बजरंग सोनवणे यांनी दिला आहे.

हेही वाचा : “… तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

बजरंग सोनवणे काय म्हणाले?

“कोण कुठे जात आहे? आरोपी कुठे आणि कोणाच्या घरी राहिले? त्यांच्याबरोबरचेही फोटो ट्वीट करा, अशी अमोल मिटकरी यांना विनंती आहे. अमोल मिटकरींना हे खूप महागात पडेल. आमचे फोटो हे लोकांबरोबरचे आहेत. मात्र, तुमचे फोटो कुठले-कुठले असतील, ते देखील मिळतील. आता मला त्या विषयात जायचं नाही”, असा इशारा बजरंग सोनवणे यांनी दिला. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

‘अमोल मिटकरींना थोडं आवरावं…’

आमदार अमोल मिटकरी यांनी बजरंग सोनवणे यांचा आणि वाल्मिक कराड याचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यावरून बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांकडे एक विनंती केली आहे. ते म्हणाले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी अमोल मिटकरी यांना थोडं आवरावं. अजित पवार यांच्यावर आमचं प्रेम आहे. पण, अमोल मिटकरी त्यात मीठ टाकण्याचा प्रयत्न करत आहेत का?”, असा सवाल खासदार सोनवणे यांनी केला.

अमोल मिटकरी यांचं ट्वीट काय?

अमोल मिटकरी यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये खासदार बजरंग सोवनणे यांच्याबरोबर वाल्मिक कराड बसलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत अमोल मिटकरी यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “लई अवघड हाय गड्या उमगाया ‘बाप्पा’ रं”. दरम्यान, अमोल मिटकरी यांच्या या ट्विटवरून आता खासदार बजरंग सोनवणे यांनी मिटकरी यांना इशारा दिला आहे. त्यामुळे यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beed ncp mp bajrang sonawane on ncp mla amol mitkari and santosh deshmukh case politics gkt