मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या जमावाने बीडमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड केली. त्यामुळे कोट्यावधींचं नुकसान झालं. त्यामुळे वातावरण कमालीचं तणावपूर्ण झालं. यानंतर बीड पोलिसांनी या घटनांमधील आरोपींवर कारवाई केली. या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. ते गुरुवारी (२ नोव्हेंबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
बीड पोलीस अधीक्षक म्हणाले, “संपूर्ण बीड जिल्ह्यात फोडतोड आणि जाळपोळ प्रकरणी १०१ आरोपींना अटक करण्यात आले आहे. याशिवाय वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी जवळपास ३०० लोकांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.”
“या घटनांमधील आरोपी हा विशेषतः तरुण वर्ग आहे. १७ ते २३ वयोगटातील ही मुलं या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. यातील काही लोक फारच आक्रमक होते. त्यांचीही ओळख पटली असून ते सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यातील काही लोकांना अटक झालेली आहे,” अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
“मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्र सरकारच्याच हातात”
दरम्यान, मनोज जरांगेंच्या उपोषणावर बोलताना शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले, “सरकारला किती वेळ हवा आहे असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांनी विचारला आहे. त्याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देत आहेत का? सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांना जरूर भेटावं, हा सरकारचा अधिकार आहे. सरकारने जरांगेंशी चर्चा करावी. आमची भूमिका स्पष्ट आहे की, आदिवासी, ओबीसी किंवा इतर समाज अशा कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाची मागणी मान्य व्हावी. हे करणं केंद्र सरकारच्याच हातात आहे.”
हेही वाचा : व्हायरल मेसेजमुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर मनोज जरांगे म्हणाले…
“मनोज जरांगेंच्या जीवाचं काही बरंवाईट झालं, तर…”
“मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्र सरकारच्या हातात आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात गुंतले आहेत. अमित शाह छत्तीसगडपासून मिझोरामपर्यंत फिरत आहेत आणि महाराष्ट्र पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात लोक आत्महत्या करत आहेत. मनोज जरांगे पाटलांचे प्राण पणाला लागले आहेत. त्यांच्या जीवाचं काही बरंवाईट झालं, तर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.