Beed Police Surnames removed from Nameplate : पोलिसांनी एकमेकांना आडनावाऐवजी केवळ नावानेच हाक मारावी असा उपक्रम बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अलीकडेच बीडमध्ये सुरू केला आहे. या उपक्रमाचे चांगले परिणाम दिसू लागल्यानंतर कॉवत यांनी आणखी एक पाऊल टाकलं आहे. त्यांनी पोलिसांच्या छातीवर असलेल्या नेमप्लेटवरील पोलिसांची आडनावं हटवली आहेत. आता बीड पोलिसांच्या नेमप्लेटवर केवळ त्यांची नावं व पदं नमूद करण्यात आली आहे. या नव्या उपक्रमाबद्दल माहिती देताना कॉवत म्हणाले, “आम्हा पोलिसांची कुठलीही जात नाही, आमचा कुठलाही धर्म नाही, आम्ही सर्वांसाठी केवळ ‘खाकी’ आहोत.”

पोलिसांच्या नेमप्लेटवरील आडनावं हटवण्याची मोहीम सुरू करणारे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत म्हणाले, “कर्तव्यामधून जात काढून टाकण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. तत्पूर्वी आम्ही पोलिसांनी एकमेकांना नावाने हाक मारायचा उपक्रम राबवला होता. आता पोलिसांच्या नेमप्लेटवरून आडनावं काढून केवळ नावं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.” बीडमध्ये वाढलेला जातीय तणाव कमी करण्यासाठी आणि पोलीस हा केवळ पोलीस म्हणून ओळखला जावा, तो त्याच्या जातीने, आडनावाने ओळखला जाऊ नये यासाठी कॉवत नवा पायंडा पाडू पाहात आहेत.

आमची कुठलीही जात नाही, आमचा कुठलाही धर्म नाही : नवनीत कॉवत

नवनीत कॉवत म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्यात तिथल्याच तालुक्यांमधील, गावांमधील तरुण पोलीस खात्यात भरती होत असतात. आपल्या विविधतापूर्ण अशा समाजातील तरुण पोलीस होतात आणि ते आपापल्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम करतात. आम्ही पोलीस खात्यात काम करतो, म्हणजेच देशासाठी काम करत असतो. त्यामुळे आमची कुठलीही जात नसते, आचा कुठलाही धर्म नसतो. आम्ही कुठल्याही नागरिकाला त्याची जात अथवा त्याचा धर्म पाहून न्याय देण्याची भूमिका घेत नाही.

“आम्ही सर्वांसाठी केवळ खाकी आहोत”

पोलीस अधीक्षक म्हणाले, “आम्ही जेव्हा बंदोबस्तानिमित्त जिल्ह्यात फिरतो तेव्हा अनेकजण आमच्या छातीवर असलेल्या नेमप्लेटवरील आमचं आडनाव वाचून आमच्याशी कसं वागायचं हे ठवतात, आम्ही त्यांच्याशी कसे वागू याचा स्वतःच वाट्टेल तसा अर्थ लावतात. ते आम्हाला थांबवायचं आहे. आमचे पोलीस बीडच्या जनतेसाठी काम करतात. लोकांसाठी आम्ही फक्त पोलीस आहोत. माझा पोलीस अधिकारी, कर्मचारी हा जेव्हा कर्तव्यावर असतो तेव्हा त्याच्या कामाचा आणि त्याच्या जातीचा काहीच संबंध नसतो. आम्ही सर्वंसाठी केवळ खाकी आहोत. आम्ही कायद्याप्रमाणेच वागणार.

Story img Loader