Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर आता मकोका लावण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे सुतोवाच काही दिवासंपूर्वीच केले होते. संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर या कायद्याअंतर्गत आता कारवाई होणार आहे. आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तर हत्या प्रकरणात सिद्धार्थ सोनवणेलाही आरोपी करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या महिन्यापासून चर्चेत आहे. ९ डिसेंबरला बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूर पद्धतीने ठार करण्यात आले होते. या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधी आवाज उठवत होते.

हे वाचा >> Maharashtra Politics : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? अजित पवार-अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?

वाल्मिक कराडचे काय?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर सर्व विरोधक आरोप करत आहेत. मात्र त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे त्याला मकोकाच्या बाहेर ठेवले गेले आहे. तसेच कृष्णा आंधळे हा आरोपीही अद्याप फरार असून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले होते – धस

संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मकोका कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात येतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. सरकारी वकिलांनीही ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. मकोका लागल्यानंतर आमदार सुरेश धस म्हणाले की, यात काहीही नवीन नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच याची घोषणा केली होती, त्याप्रमाणे मकोका लावला गेला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beed sarpanch santosh deshmukh murder case all accused booked under mcoca what about walmik karad kvg