CM Devendra Fadnavis on Beed Sarpanch Murder: बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणावर सर्वच स्तरातून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये चालू असून पहिल्या दिवसापासूनच विरोधी पक्षांच्या आमदारांनी या मुद्द्यावरून महायुती सरकारला परखड शब्दांत जाब विचारला. विरोधकांनी सातत्याने यावर राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात निवेदन सादर करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन सभागृहाला दिलं. तसेच, त्या भागातील पोलीस अधीक्षकांचीही बदली केली. यावर आता मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाची भावनिक प्रतिक्रिया समोर आली आहे.
धनंजय देशमुख यांची सरकारकडे मागणी
मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर आपण समाधानी असून आता एकच अपेक्षा असल्याचं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी टीव्ही ९ ला सांगितलं. “मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर मी समाधानी आहे. पण आता मला एक अपेक्षित आहे. उद्या आमचा तेराव्याचा विधी आहे. उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या आरोपींना जेरबंद केलं जावं. पोलीस अधिकाऱ्याची बदली करणं, न करणं हा मुख्यमंत्रयांचा विषय आहे. कारण त्यांना तपासात वेग किती हवाय त्याहिशेबाने त्यांनी निर्णय घेतला असेल. माझं एकच म्हणणं आहे. माझ्या कुटुंबाला, माझ्या गावाला न्याय हवाय. माझा भाऊ तर आता परत येऊ शकणार नाही. पण गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायला हवी”, असं धनंजय देशमुख म्हणाले.
“आरोपी जेरबंद झाले, की न्यायालयीन प्रक्रियेसाठी ३ ते ६ महिने लागतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण ही प्रक्रिया अधिकाधिक जलद करावी, अशी मागणी आम्ही करणार आहे. आता मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केलं आहे. पण उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे. मग त्यासाठी कशी यंत्रणा वापरायची ते तुम्ही बघा. हा माझा आक्रोश आहे. मला ते आरोपी सगळ्यात आधी जेरबंद हवे आहेत. दुखवट्यात ४-८ दिवस गेले. पण आता आरोपींना जेरबंद केलं पाहिजे”, असंही धनंजय देशमुख यांनी नमूद केलं.
धनंजय देशमुख यांनी सांगितला घटनाक्रम!
“६ तारखेला ज्यावेळी मला फोन आला की स्टोअरयार्डला वाद झालाय, तिथले वॉचमन अशोक सोनवणे यांना मारहाण केली आणि माझे भाऊ (सरपंच संतोष देशमुख) तिथे आल्यानंतर त्यांच्याशीही ते लोक भांडण करत होते. वाल्मिक कराड यांचं नाव सांगून काही लोक बाहेरून खंडणी मागण्यासाठी आले होते. त्यांना वेगळ्या खोलीत बसवलं होतं. मी तिथे गेलो, तेव्हा तिथे वाल्मिक कराड यांचे बाजूच्या गावचे सरपंच संजय केदार यांच्या फोनवर फोन येत होते. ते संतोष देशमुखविषयी माहिती विचारत होते”, असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं.
“मी स्वत: केज पोलीस स्थानकाचे पीएसआय आनंद शिंदे यांना फोन केला. त्यांना मी तातडीने तिथे यायची विनंती केली. आम्हाला भांडण करायचंच नव्हतं. तिथल्या लोकांना फक्त संरक्षण द्यायचं होतं. माझे भाऊ त्यासाठीच तिथे गेले होते. शिंदे तिथे आल्यानंतर माझ्या भावाच्या खुनाच्या आरोपींना गाडीतून पोलीस स्थानकात पाठवलं. मला माहिती नव्हतं की हे इतके क्रूर आहेत, हे माझ्या भावाची इतकी निर्घृण हत्या करतील. त्या दिवशी माझा निर्णय चुकला. त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी मीच तिथे आंदोलन करायला पाहिजे होतं. पण आम्ही त्यांना गाडीतून पोलिसांसोबत पाठवलं”, अशा शब्दांत धनंजय देशमुख यांनी त्यांची व्यथा मांडली.