Beed Sarpanch Murder Case: गेल्या काही दिवसांपासून बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचा मु्द्दा चर्चेत आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येचे तपशील समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विरोधकांनी या प्रकरणावर चर्चेची मागणी करत सभात्याग केला. आज यासंदर्भात विधानसभेत चर्चेदरम्यान बीडचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी उद्विग्न भूमिका मांडत अधिवेशन संपण्यापूर्वी वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी केली.
वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड नामक व्यक्तीविरोधात ३०२ कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. “संतोष देशमुखला गाडी अडवून जेव्हा उचलून नेलं, त्याचा सहकारी त्याच्यासोबत होता. तो सहकारी पोलीस स्थानकात वारंवार सांगत होता की सरपंचांना उचलून नेलं आहे आणि त्यांचा जीव धोक्यात आहे, तेव्हा पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. २-३ तासांनंतर म्हणजे त्या सरपंचाची हत्या झाल्यानंतरच पोलिसांनी हालचाल केली. अत्यंत क्रूरपणे सरपंचाची हत्या करण्यात आली आहे”, असं संदीप क्षीरसागर विधानसभेत म्हणाले.
वाल्मिक कराडमुळेच जातीपातीचं राजकारण – क्षीरसागर
“आरोपीचं नाव वाल्मिक कराड आहे. त्याचे मोबाईल रेकॉर्ड बघितले, तर पूर्ण प्रकरण उघड होईल. ६, ९ आणि ११ तारखेचे त्याचे सीडीआर रेकॉर्डवर आणावेत. जर वस्तुस्थिती खोटी असेल, तर तुम्ही आमच्यावरही कारवाई करा. वाल्मिक कराडमुळेच बीडमध्ये जातीपातीचं राजकारण सुरू झालं आहे. कुठेही खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. या प्रकरणात न्यायालयीन चौकशी लावलीच पाहिजे. पण त्याचबरोबर जोपर्यंत हे लोक अटक होणार नाहीत तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही”, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली.
“वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. पण तरी त्याला अटक झालेली नाही. ३०२ च्या गुन्ह्यातला मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे. त्यामुळे त्या गुन्ह्यात याचं नाव आलं पाहिजे. अधिवेशन संपण्याआधी वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे. हे लोक इतर सगळे गैरप्रकार करण्यात तरबेज आहेत. या प्रकरणाचा फास्ट ट्रॅकवर निकाल लागायला हवा”, असंही संदीप क्षीरसागर यांनी यावेळी नमूद केलं.
“खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार”
बीडमध्ये सर्रासपणे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत केला. “बीडमध्ये दोन प्रकार चालू आहेत. एकतर गुन्हा खरा असूनही वेळेवर गुन्हा दाखल होत नाही. या प्रकरणात १२ तास उलटल्यानंतर लोक आंदोलनाला बसले, तेव्हा गुन्हा दाखल झाला. आणि दुसरं म्हणजे खोटे गुन्हे दाखल करणे. ३०७ चा गुन्हा आमच्या जिल्ह्यात चॉकलेट खाल्ल्यासारखा दाखल होतो. बीडमध्ये कुणावर काय होईल आणि कोण काय करेल याचा काही नेम राहिलेला नाही”, असं ते म्हणाले.
Beed Sarpanch Murder Case:
“त्या सरपंचाच्या गावात मी गेलो तेव्हा गावकरी म्हणाले न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस स्थानक पेटवून देऊ. वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये काय परिस्थिती उद्भवेल सांगता येत नाही. लोक रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत. कायदा-सुव्यवस्था सांभाळणं अवघड होऊन जाईल”, असा इशारा आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला आहे.